जन्माने केनियन, पण स्वदेशातील सत्ताधाऱ्यांवर टीका केल्याने १९७४ पासून अमेरिकेत परागंदा व्हावे लागलेले प्राध्यापक अली मझरुई यांना मायदेशातील दफनभूमीत अखेर कायमचे स्थान मिळणार आहे. आफ्रिकन एकात्मतावादाचा पुरस्कार हिरिरीने करणाऱ्या या विद्वानाने, १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या मृत्यूपूर्वीच आपला अन्त्यविधी मायदेशी व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार रविवारी घडले.
आफ्रिकेतील मानवसमूह आधुनिक शिक्षणामुळे एक होऊ शकतात आणि आधुनिक जगाने आफ्रिकेची ही एकात्मता समजून घ्यायला हवी, असे मानणारे मझरुई आफ्रिकेचा अभ्यास करताना या एकात्मतेतील आजचे अडथळे कोणते, याचा अचूक शोध घेत राहिले. त्यातून तब्बल २०हून अधिक पुस्तके तयार झाली. या पुस्तकांतून त्यांनी ‘नायकत्ववादा’चा अभ्यास मांडला, नेत्यांच्या सर्वसत्ताधारीकरणाची पाळेमुळे ‘उहुरू’ पूजेसारख्या प्रथांत शोधली, वंशभेद आणि हिटलरी ज्यूद्वेष यांची स्वच्छ तुलना केली, तसेच पाश्चात्त्य कुप्रथा चटकन कशा आत्मसात होतात याकडे लक्ष वेधले. त्यांच्या अभ्यासातून मिळणाऱ्या या दिशा ‘राजकीय समाजशास्त्रा’च्या अभ्यासकांना अन्य खंडांतही उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. आफ्रिकेतील इस्लाम, हाही त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय होता. निवृत्तीनंतर, विशेषत: २००१ पासून सर्व मुस्लिमांकडे अमेरिका संशयानेच पाहू लागल्यानंतर मझरुई यांनी याविषयी केलेले मतप्रदर्शन वादग्रस्त ठरू शकणारे आहे. ‘१९९० च्या दशकानंतर मुस्लिमांनी अधिक पापे केली, की मुस्लिमांविरुद्ध अधिक पापे (इतरांनी) केली?’ असा सवालच त्यांनी केला होता.. तोही, मूलतत्त्ववाद आणि कोणताही अतिरेक यांचा सातत्याने निषेध करण्याच्या भूमिकेला अजिबात फाटा न देता! पाश्चात्त्य राष्ट्रांनी ‘धडा शिकवण्या’साठी जी युद्धे गेल्या २० वर्षांत केली त्यांचा ऊहापोह व्हायलाच हवा, असे त्यांचे म्हणणे!

केनियात मोम्बासा येथे १९३३ साली, श्रीमंत मुस्लीम कुटुंबात जन्मलेले अली मझरुई यांनी पदवी मँचेस्टर विद्यापीठात, पदव्युत्तर पदवी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात, तर पीएच.डी. ऑक्सफर्डहून मिळविली. केनिया स्वतंत्र झाल्यावर तीन वर्षांनी, १९६६ मध्ये ते मायदेशी परतले.. परंतु राजकीय भूमिकेपायीच जेव्हा मायदेशी राहणे अशक्य झाले, तेव्हा त्यांना अमेरिकेत आश्रय घ्यावा लागला. पुढे मात्र वेळोवेळी अमेरिकाविरोधी तात्त्विक भूमिका त्यांनी मांडल्या. बिंग्हॅम्टन या तुलनेने अपरिचित विद्यापीठातील हे प्राध्यापक मझरुई ‘अभ्यागत व्याख्याते’ म्हणून हार्वर्ड, स्टॅन्फर्ड, शिकागो, ऑक्सफर्ड, सिंगापूर तसेच पुढे आफ्रिकेच्याही अनेक विद्यापीठांत जात असत. २००५ साली, ‘जगभरचे १०० लोकहितवादी विद्वान’ या यादीत फॉरेन पॉलिसी नियतकालिकाने त्यांचा समावेश केला होता.