प्रबंध गायकीपासून ते ख्याल गायकीपर्यंतचा अभिजात संगीताचा सारा प्रवास उत्तरेकडील प्रांतांमध्येच घडून आला. तरीही महाराष्ट्राने गेल्या शंभर वर्षांत अभिजात संगीताच्या क्षेत्रात इतकी भरीव अशी कामगिरी केली की, त्याने अन्य कोणत्याही प्रांताला हेवा वाटावा. हे सारे घडले, याचे कारण महाराष्ट्रातील रसिकाने स्वत:ची जडणघडण करण्यासाठी वैचारिक परंपरेचा आधार घेतला.

गेल्या काही दशकांत भारतातील प्रत्येक कलावंताला महाराष्ट्रातील रसिकांची दाद हवीशी वाटू लागली आहे. ज्या प्रांताला अभिजात संगीताची कोणत्याही प्रकारची दीर्घकालीन परंपरा नाही, तेथे संगीत एवढय़ा चांगल्या पद्धतीने ऐकणारे रसिक कसे काय असू शकतात, असा प्रश्न महाराष्ट्राबाहेरील अनेकांना पडतो. परंतु त्याचे उत्तर मात्र सापडत नाही. कोणत्याही मातीत जसे लोकसंगीत जन्मते आणि वाढते, तसेच याही प्रांतात घडले आणि लोकसंगीताच्या बरोबरीने चार अंगुळे वर गेलेल्या भक्तिसंगीताने येथील रसिकांची संगीतविषयक जाण वाढवण्यास निश्चितच मदत केली. कीर्तन, भजन आणि अभंग यांसारख्या संगीतप्रकारांनी मराठीजनांच्या संगीतप्रेमाची मशागत केली. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळात या प्रांती अभिजात संगीताची एक पणती पेटली, ती आजतागायत तेवती राहिली आहे. महाराष्ट्राचे स्वत:चे असे वाद्य नाही. नाही म्हणायला चिपळ्या आणि झांज किंवा तुतारी ही वाद्ये महाराष्ट्राच्या नावावर जमा होतात, पण ही वाद्ये संगीत निर्माण करण्यासाठी उपयुक्त नसतात. ती नाद निर्माण करतात परंतु संगीत निर्माण करत नाहीत, कारण त्यांची निर्मिती संगीताला पूरक होण्यासाठीच झालेली आहे. बासरी, सतार, सरोद, वीणा यांसारख्या वाद्यांच्या परंपरेत महाराष्ट्रातील एकही वाद्य नाही. वाद्यांच्या आधीपासूनच अस्तित्वात आलेल्या संगीतातही या भूमीचे योगदान यथातथा म्हणावे एवढेच. अशा पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात असे कोणते मन्वंतर घडून आले की ज्यामुळे येथील रसिकांमध्ये अभिजात संगीताची आवड निर्माण झाली? सगळ्या कलावंतांना मराठी रसिकांची दाद मिळवण्याची एवढी आस का असते? त्यांच्या रसिकतेला आव्हान देण्याची जिद्द ठेवून अनेक कलावंत या प्रांतात पुन:पुन्हा येतात आणि आपल्या कलागुणांची कदर होण्याची इच्छा बाळगतात. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभ काळात महाराष्ट्रातील अभिजात संगीतामध्ये फार मोठय़ा घडामोडी घडून आल्या. त्यामुळे रसिकतेच्या मोजपट्टय़ा बदलल्या आणि त्यामुळे अभिजाततेच्याही.
भारतीय अभिजात संगीताची गंगोत्री म्हणायची, तर ग्वाल्हेरची. म्हणजे मध्य प्रदेशची. ती तेथून उत्तरेच्या टोकापर्यंत पोहोचली आणि स्थिरावलीही. तेथील मूळच्या कलावंतांच्या सर्जनशीलतेला आव्हान देणाऱ्या ग्वाल्हेर गायकीने उत्तरेकडील भागात मोठाच चमत्कार घडवून आणला होता. त्याचे आणखी एक कारण त्या काळातील सम्राटांच्या दरबारात संगीताला मिळत गेलेली प्रतिष्ठा. उत्तम संगीत करणारा कलावंत आपल्या पदरी असावा, अशी तमन्ना बाळगून त्यांना शोधणारे अनेक राजे-महाराजे आणि बादशहा स्वत: संगीताचे भोक्ते होते. त्यांच्यापाशी कलेबद्दलची उच्च अभिरुची होती. त्यामुळे संगीत करणाऱ्या कुणालाही उत्तरेकडे गेल्यास उपाशी मरण्याची वेळ येत नसे. दरबारी संगीत सामान्यांच्या आटोक्यात नसले, तरी त्यांच्यामध्ये कलेबद्दल कमालीची आपुलकीची भावना होती. महाराष्ट्रापासून वरच्या भागात जायला लागले, तर संगीताची ही ओढ अधिकाधिक गडद होत जाताना दिसते. प्रबंध गायकीपासून ते ख्याल गायकीपर्यंतचा अभिजात संगीताचा सारा प्रवास उत्तरेकडील प्रांतांमध्येच घडून आला. संगीतातील या सगळ्या अनोख्या प्रयोगांना तेथेच पहिल्यांदा वाहवा मिळाली. संपर्काची, दळणवळणाची आणि संगीत पोहोचण्याची कोणतीही साधने नसतानाच्या काळात हे घडून आले, ते केवळ उच्च कोटीच्या कलावंतांच्या सर्जनामुळे. दरबारात राजगवई होता आले तर प्रतिष्ठेबरोबरच जगण्याची भ्रांतही मिटत असे आणि संगीत करण्यासाठी स्वस्थचित्तताही लाभत असे. हे सारे घडत होते तेव्हा महाराष्ट्रात संतपरंपरेने निर्माण केलेली विचारांची परंपरा लखलखत होती. शास्त्रकाटय़ाच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून तपासून घेण्याची प्रवृत्ती मूळ धरत असतानाच महाराष्ट्र प्रांती कलांपेक्षा विचारांना अधिक प्राधान्य मिळत होते. तेराव्या शतकात सुरू झालेली ही संतपरंपरा सातत्य राखीत अधिक तेजोमान होत होती आणि त्या काळात या दगडांच्या देशावर सतत होणाऱ्या आक्रमणांपासून स्वत:च्या समाजाचा बचाव करण्यास सिद्ध होत होती. तेव्हा जातीधर्माचे जोखड संतपरंपरेच्या प्रभावाने कमी होत होते आणि समाज कोणत्याही गोष्टीला सहज भुलून जात नव्हता.
अशा सामाजिक अवस्थेत संगीताला कितीसे स्थान मिळणार, हा प्रश्न होताच. परंतु त्याकडे लक्ष देण्याएवढीही फुरसत येथील समाजाला नव्हती. येथे राज्य करणाऱ्या सगळ्यांना आपले राज्य टिकवण्यासाठीच एवढी धडपड करावी लागत होती, की संगीतासारख्या कलांच्या उन्नतीकडे लक्ष देण्यास त्यांच्याकडे वेळ कुठून असणार? पदरी गायक ठेवावा की त्याऐवजी चार सैनिक अधिक ठेवावेत, अशा चिंतेत असणाऱ्या राज्यकर्त्यांना म्हणूनच याबाबत दोषी धरता येणार नाही. अशाही अवस्थेत महाराष्ट्राने गेल्या शंभर वर्षांत अभिजात संगीताच्या क्षेत्रात इतकी भरीव अशी कामगिरी केली की, त्याने अन्य कोणत्याही प्रांताला हेवा वाटावा. हे सारे घडले, याचे कारण महाराष्ट्रातील रसिकाने स्वत:ची जडणघडण करण्यासाठी वैचारिक परंपरेचा आधार घेतला. ख्याल, ठुमरी, टप्पा, तराणा, होरी, कजरी, कव्वाली यांसारख्या कोणत्याही संगीत प्रकाराचा जन्म महाराष्ट्रात झाला नाही. तालाच्या दुनियेतही महाराष्ट्राच्या नावावर कोणती परंपरा लिहिलेली नाही. तबल्याच्या परंपरेतील सगळी घराणीही उत्तरेकडीलच. संगीतात जशी ग्वाल्हेर, दिल्ली, इंदौर, पतियाळा यांसारख्या घराण्यांची दीर्घ परंपरा प्रस्थापित झाली, ती एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्राकडेही सरकू लागली. आजच्या हरयाणातील कैराना या गावातून बडोद्यापर्यंत प्रवास करत आलेले अब्दुल करीम खाँ (यांनी ध्वनिमुद्रणाच्या तंत्राला ज्या आत्मविश्वासाने धडक दिली, त्यास तोड नाही!), राजस्थानमधील जयपूर या शहराचे नाव लावून महाराष्ट्रातील कलापूर म्हणजे कोल्हापुरात स्थायिक झालेले अल्लादिया खाँ, उत्तरेकडून मुंबईत स्थिरस्थावर होत भेंडीबझार घराणे स्थापन करणारे छज्जू खाँ, नझीर खाँ आणि खादिम हुसेन खाँ, दक्षिणेकडून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झालेले पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या कितीकांनी महाराष्ट्राला संगीताच्या दरबारात अतिशय मानाचे स्थान मिळवून दिले. शेकडो वर्षांच्या उस्तादी परंपरेला भीमसेनी स्वरांनी याच महाराष्ट्रातून आव्हान दिले. पंडित जसराज यांच्यासारख्या उत्तरेकडून आलेल्या कलावंताने महाराष्ट्राला आणखी वेगळी ओळख प्राप्त करून दिली. नाही म्हणायला फार पूर्वी येथेही गोखले घराणे अस्तित्वात होतेच. काळाच्या ओघात महाराष्ट्रात विकास पावलेली घराणीच आजही संगीताच्या प्रांतात आपली झळाळी टिकवून आहेत, हेही तेवढेच महत्त्वाचे मानायला हवे.
घराण्यांच्या उगमातून निर्माण होत गेलेल्या शैलीच्या अनेक नव्या प्रयोगांचे मराठी रसिकांनी स्वागत केले. अण्णासाहेब किलरेस्कर यांनी संगीत नाटकाच्या रूपात कर्नाटक आणि हिंदुस्तानी संगीतातील जो संकर घडवून आणला, तोही सर्वात प्रथम महाराष्ट्रानेच स्वीकारला. नुसता स्वीकारला नाही, तर त्याचे स्वागत केले. अभिजात संगीताला नाटय़संगीतातून समाजापर्यंत पोहोचता आल्याने ते दरबारातून थेट सामान्यांपर्यंत पोहोचले. अभिजाततेला त्यामुळे खतपाणी मिळाले आणि नवे प्रयोग करण्याची ऊर्मी प्राप्त झाली. नवे स्वीकारण्याची मराठी रसिकांची ही क्षमता देशातील सगळ्याच कलावंतांसाठी आव्हानात्मक ठरली. आपल्या कलाप्रयोगांना समजावून घेणाऱ्या रसिकांच्या शोधात िहडणाऱ्या कलावंतांना त्यामुळे महाराष्ट्र आपला वाटू लागला. उत्तम साहित्यगुण असलेल्या कवितेला संगीताच्या कोंदणात बसवून एका नव्या भावगीत परंपरेची स्थापनाही फक्त मराठी मातीतच घडून येऊ शकली.
वैचारिक परंपरेतून निर्माण झालेल्या सामाजिक चळवळींचा थेट परिणाम कलांमध्ये घडून आला, तोही महाराष्ट्रात. विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत संगीत नाटकांमध्ये स्त्री भूमिका करण्यासाठी पुरुषांनाच लुगडे नेसावे लागत होते. पुढारलेल्या समाजाने त्यातून वाट काढत हिराबाई बडोदेकरांच्या रूपाने पहिला शालीन अभिजात स्वर ऐकला आणि मनापासून दादही दिली. ज्या काळात स्त्रीला गायन करण्याचीच काय पण ऐकण्याचीही बंदी होती, त्या काळात हिराबाईंनी संगीताच्या माध्यमातून सांस्कृतिक क्रांती घडवली. महात्मा फुले यांनी १८४८ मध्ये मुलींची शाळा सुरू करून जे बीज रोवले होते, त्याचा हा परिणाम होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राजकीय स्वातंत्र्याचाही तो परिपाक होता. अन्यथा शेजारी असलेल्या कर्नाटकातील कर्नाटक संगीताची परंपरा महाराष्ट्रात स्थायिक होण्याऐवजी शेकडो किलोमीटर दूरवरून संगीताची ही गंगा बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्रात आणली नसती आणि त्यांचे शिष्योत्तम विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी तिचा देशभर प्रचार आणि प्रसारही केला नसता. संगीतात असलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची कास धरण्यामागे शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याची प्रेरणा जशी कारणीभूत ठरली, तशीच संगीताबद्दलचे अध्ययन आणि अभ्यास करणाऱ्या विष्णू नारायण भातखंडे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व घडण्यासही उपकारक ठरली. एवढेच काय जातीधर्माच्या पलीकडे जाण्याच्या मराठी प्रवृत्तीमुळे सर्व धर्मीयांना महाराष्ट्राने नेहमीच आदराने वागवले आणि प्रतिष्ठाही दिली. देशाच्या संगीत व्यवहारात चित्रपट संगीताचा वरचष्मा याच महाराष्ट्रामुळे दिसून आला आणि संगीताची नवी बाजारपेठ उभी करण्यासाठीही महाराष्ट्रातील आर्थिक विकास उपयोगी पडला.
मराठी रसिक घडण्यासाठी या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटना फारच मोलाच्या होत्या. जगण्यासाठीचे सारे कष्ट करूनही आपली उच्च अभिरुची मराठी माणसाने टिकवून ठेवली. नव्याचे स्वागत करताना उगीच हुरळून न जाता, खात्री केल्याशिवाय मनापासून दाद न देणारा मराठी रसिक म्हणूनच सगळ्या कलावंतांसाठी अतिशय महत्त्वाचा वाटू लागला आहे.   
 (समाप्त)                                                        

Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
amar kale wardha marathi news, ramdas tadas marathi news
वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?
Ram Satpute Answer to Praniti Shinde
प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंचं उत्तर, “धर्म आणि जातींमध्ये फूट पाडून इतकी वर्षे…”
22 stripes tigers spotted found in radhanagari wildlife
सिंधुदुर्ग-कोल्हापूर डोंगररांगांत २२ पट्टेरी वाघ!