‘प्राध्यापकी समीक्षा’ अशी हिणवणी सुरू झाली होती, त्या १९६०च्या दशकात प्राध्यापक मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर यांच्या लेखणीला बहर येऊ लागला. याला केवळ योगायोग म्हणून सोडून देता येणार नाही. मराठीत होणारी समीक्षा ‘थाट आणि घाट’ वगैरे परिभाषेत- आणि या परिभाषेनेच आखलेल्या वैचारिक परिघातसुद्धा- अडकली होती, म्हणून तिची हिणवणी रास्त ठरली. अशा काळात समीक्षेला वाचकांपर्यंत नेण्याची जबाबदारी नव्याने ओळखली पाहिजे, आखीव परिघापासून समीक्षेला मोकळे केले पाहिजे, हे भान राखणाऱ्यांमध्ये हातकणंगलेकरांचे नाव महत्त्वाचे आहे. मासिकांमधून, तसेच ‘लोकसत्ता’आदी वृत्तपत्रांच्या मराठी पुस्तक-परीक्षणाच्या पानांवरही त्यांनी अगदी अलीकडेपर्यंत लेखन केले. ते त्यांनी गौण मानले नाही. समीक्षा ‘लोकप्रिय’ वगैरे करण्याच्या फंदात हातकणंगलेकर पडले नव्हते, पण लोकांपर्यंत समीक्षा पोहोचवणाऱ्यांत त्यांचे नाव आदराने घेतले जाईल. त्यांचे हे वर्तमानपत्री लिखाणही निव्वळ अभिप्रायवजा नसे. वरवर पाहिल्यास हे लिखाण माहिती देणारे वाटे, पण हेच त्यांचे वैशिष्टय़ होते. पुस्तक असेच का, हे आधी समजून घ्यायचे; म्हणजे त्यासाठी लेखकाचा परिसर ध्यानात घ्यायचा, लिखाणाचा विषय आणि लेखकाला त्याबद्दल असलेला अनुभव अथवा त्याचा अभ्यास लक्षात घ्यायचा आणि मग ‘या लेखकाने हा विषय असा मांडला आहे’ असे सांगायचे, अशी ती पद्धत. चरित्रात्मक आणि आस्वादक या दोन समीक्षाशैलींपेक्षा निराळी, नवसमीक्षेची शैली हातकणंगलेकरांनी जपली होती. श्री. दा. पानवलकर आणि जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा निवडून त्यांची पुस्तके सिद्ध करताना किंवा ‘जीएंची निवडक पत्रे’चे सहसंपादक म्हणून हातकणंगलेकरांनी लिहिलेल्या प्रस्तावना असोत, समीक्षकाने लेखकाची तळीही उचलायची नाही आणि त्याला झोडपायचेही नाही, लेखक कसा आहे हे मात्र समीक्षकाने सांगायचे, असे पथ्य हातकणंगलेकरांनी पाळले, पण जीए हे त्यांचे मित्रच. पानवलकरही सांगातीच. अशी कितीएक माणसे हातकणंगलेकरांनी जोडलेली होती, त्यांच्याबद्दल व्यक्तिलेखांचे संग्रह तयार होतील इतके लिखाण या समीक्षकाने केले. ‘साहित्याने मने मोठी केली पाहिजेत, माणसे घडवली पाहिजेत’ असा आदर्श ते बाळगत असल्यामुळे, आठवणी सांगतानाही फक्त स्वत:बद्दल न सांगता व्यक्तिमत्त्वांबद्दल आणि समाजाबद्दल काही म्हणायचे आहे ही असोशी त्यांच्या समीक्षेतर लिखाणातूनही दिसे. सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात दीर्घकाळ प्राध्यापक आणि पुढे प्राचार्य होऊन, पुण्या-मुंबईला दखल घ्यावीच लागेल, असे काम करीत राहिले. ‘वाङ्मयीन शैली आणि तंत्र’ हा विलिंग्डनमधला परिसंवाद किंवा त्यानंतर गो. मा. पवार यांच्या साथीने कोल्हापुरात भरविलेला ‘मराठी साहित्याचे प्रेरणा आणि प्रवाह’ हा परिसंवाद, महाराष्ट्राच्या साहित्यिक इतिहासात महत्त्वाचे आहेत. यापैकी ‘शैली आणि तंत्र’मध्ये सुलेखनकार र. कृ. जोशी यांनी दासोपंतांच्या पासोडीपासून अरीघी-अपोलोनिए या युरोपीय डिझायनर्सपर्यंतची ‘दृश्य-काव्य’परंपरा उलगडली होती, तर ‘प्रेरणा आणि प्रवाहा’त नेमाडे यांनी देशीवादाचा पटच उलगडला होता. उपयोजित समीक्षा आणि अभ्यासू समीक्षा-चिंतन, ललित म्हणावे असे, परंतु विदग्धच गद्यलेखन असा संचार करणाऱ्या हातकणंगलेकरांचा मान मोठा, हे महाराष्ट्र सारस्वताला माहीत होते. तरीही, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा प्रकारच इतका भंपक होत गेला की, २००२ साली संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हातकणंगलेकर पडले आणि २००९ मध्ये- म्हणजे ते मावळते अध्यक्ष असताना- त्यांना बिनमहत्त्वाचे करून टाकण्यातच संमेलनाच्या तत्कालीन धुरिणांनी धन्यता मानली. ‘आता इथे राहून तरी काय करावे’ म्हणून त्या संमेलनातून हातकणंगलेकर निघून गेले.. आणि रविवारी, त्यांनी जगाचाही निरोप असाच अवचितपणे घेतला.