राजस्थान, मध्य प्रदेश आणि झारखंडमधील भाजपच्या विजयानंतर भरधाव निघालेल्या मोदीरथाचा मार्ग गुजरातमधील महानगर दंडाधिकाऱ्यांनी गुजरात दंगलीप्रकरणी दिलेल्या निकालाने निष्कंटक झाल्याचे भासत असले, तरी वस्तुस्थिती तशी नाही. या निकालाने नरेंद्र मोदी यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र नक्कीच मिळाले आहे. त्यामुळे देशभरातील मोदी ब्रिगेडला हायसे वाटले असणार यात शंका नाही. राहता राहिला प्रश्न मोदींचे निकटवर्ती अमित शहा यांनी, त्यांच्या साहेबांकरिता एका तरुणीवर गुप्तहेरांकडून ठेवलेल्या पाळतीचा. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ न्यायालयीन आयोगाची स्थापना करणार आहे. पुढील तीन महिन्यांत त्या चौकशीचा अहवाल येईल. मोदींना त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मोदी ब्रिगेडची गोष्ट वेगळी आहे. अहवालातून काहीही बाहेर आले तरी मोदीभक्तांच्या श्रद्धेमध्ये अणुमात्र फरक पडणार नाही. त्यांनी मोदींना केव्हाच पंतप्रधानपदावर बसवून टाकले आहे. पण आपल्या भक्तांचे प्रेम हे टीकाकारांवर समाजमाध्यमातून तुटून पडणे यापलीकडे फारसे उपयोगाचे नाही; ट्विटरवरील फॉलोअर्स आणि फेसबुकवरील लाइक्स यांची संख्या या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही, हे जाणण्याची राजकीय शहाणीव मोदी यांच्याकडे निश्चितच आहे. निवडणुकीचे गणित जमवायचे तर त्यासाठी जाती, धर्म, वर्ग यांची समीकरणे जुळवावी लागतात, हे येथील राजकीय वास्तव आम आदमी पक्षाने दिल्लीत मोडीत काढले असले, तरी तो अजूनही अपवादच आहे. याची जाणीवही मोदी यांना नक्कीच असणार. गुजरात दंगल प्रकरणाच्या निकालानंतर त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ लेखातून हीच जाणीव स्पष्ट दिसते. मोदी यांचा चेहरा विकासपुरुषाचा आहे. त्यास सर्वसमावेशकत्वाची रंगसफेदी करण्याचा प्रयत्न म्हणजे तो लेख आहे. लोकसभा निवडणुकीत रालोआला सर्वाधिक जागा मिळतील; परंतु पूर्ण बहुमत मिळेल अशी शक्यता सध्या तरी दृष्टिपथात नाही. अशा वेळी सत्तास्थापनेसाठी अन्य पक्षांकडून रसद घ्यावी लागणार आहे. त्याची तरतूद करण्याचा प्रयत्न म्हणजे तो लेख आहे. आपण दंगल प्रकरणाच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडलो आहोत, हे या लेखाद्वारे अधोरेखित करून मोदींनी या संभाव्य मित्रपक्षांची सोय करून दिली आहे. उद्या वेळ आलीच तर त्यांना मोदींचा हात धरणे यामुळे सोपे होणार आहे. अर्थात या लेखामागे केवळ राजकीय-व्यापारी उद्देशच आहे असे म्हणणे हा मोदींवरील अन्याय ठरेल. गुजरात दंगलीतील िहसक वेडाचारामुळे आपण मुळापासून हादरलो होतो, ही जी भावना मोदी यांनी व्यक्त केली आहे त्याबद्दल शंका घेता येणार नाही. दंगलीबद्दल त्यांनी माफी मागितली नाही, अशी टीका आता केली जात आहे. परंतु त्याचे कारण स्पष्ट आहे. त्यांना माफीचे काही कारणच दिसले नाही. न्यायालयानेही तसा निर्वाळा दिला आहे. तेव्हा तशी अपेक्षा करणे चूक आहे. एक गोष्ट खरी, की या लेखात त्यांनी केलेले काही दावे वस्तुस्थितीशी विपरीत आहेत. दंगलग्रस्तांना मदत आणि पुनर्वसन करण्यासाठी साधी समिती नेमण्यातही मोदींचे सरकार चालढकल करीत होते आणि अखेर वाजपेयींना त्यात हस्तक्षेप करावा लागला होता, असे वृत्त गेल्या शनिवारीच ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केले होते. तेव्हा मोदी यांच्या शोकाकुल लेखाने भारावून जाण्याचेही कारण नाही. प्रतिमासंवर्धनाची सुंदर खेळी एवढाच त्या लेखाचा खरा अर्थ आहे.