जाणिवेचं केंद्र बदलण्याची कल्पना ठीक आहे, पण प्रत्यक्षात ते शक्य आहे का, असा प्रश्न कर्मेद्रनं केला.
अचलदादा – अहो, आपण नेहमीच्या जगण्यात असं जाणिवेचं केंद्र बदलतोच की! (कर्मेद्रचा चेहरा प्रश्नार्थक झाला) आईला भूक लागली आहे, पण मुलाची भूक तिला महत्त्वाची वाटते. त्याला खाऊ घालून मग जे उरेल त्यात तिला समाधान वाटतं. म्हणजे वात्सल्याच्या प्रभावाने तिच्या भुकेवर मात केलीच ना? जाणिवेचं केंद्र स्वत:च्या भुकेवरून वात्सल्याकडे वळलंच ना? आपल्या व्यक्तिग दु:खाला चिकटलेली जाणीव दूर करून आपण ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्या दु:खाला प्राधान्य देतोच ना?
हृदयेंद्र – एकदा मी कर्मूकडे गेलो होतो. डोकं दुखत होतं म्हणून चेहरा मलूल झाला होता. तोच ख्यातिवहिनींची तब्येत बिघडली तर आपली डोकेदुखी विसरून हा त्यांच्यासाठी धावपळ करू लागला..
कर्मेद्र – (हसत) बाबा रे, तुमच्यासारखा आमचा आध्यात्किम संसार नाही बरं.. बायको हेच तर डोकेदुखीचं खरं कारण असतं.. तिची तब्येत बिघडत जाणं म्हणजे आपली डोकेदुखी वाढत जाणंच असतं!
अचलदादा – विनोद सोडून द्या, पण तुमचं जाणिवेचं केंद्र बदललंच ना? आणि यात स्त्रियाचा अग्रभागी असतात बरं! स्वत:चा थकवा, स्वत:चा आजार बाजूला ठेवून आपल्या माणसांसाठी त्या किती खस्ता खात असतात.. असे तर हृदयनं सांगितल्यानुसार अवास्तव अपेक्षांमुळे निर्माण झालेलं व्यक्तिगत दु:ख आहे ना त्याचा प्रभाव तेव्हाच ओसरेल जेव्हा दुसरा कोणता तरी मोठा प्रभाव उत्पन्न होईल! हा प्रभाव आहे सद्गुरुंच्या सहवासातून येणाऱ्या निर्भयतेचा, निश्चिंतीचा!
कर्मेद्र – दादा ठीक आहे अवास्तव कल्पनांमुळे भ्रामक दु:ख निर्माण होतंही, पण एखाद्या घरात भाऊबंदकी सुरू आहे, धंद्यात भागीदारांचे मतभेद विकोपाला गेले आहेत, सासुरवास किंवा आता तर सूनवासही असतो.. ही दु:खं तर अवास्तव किंवा काल्पनिक नाहीत ना?
अचलदादा – याच्या मुळाशीही ज्याच्या-त्याच्या अवास्तव कल्पना आहेतच, पण तरीही ही दु:खं स्वीकारून ती सोसत असतानाच त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या पलीकडे जावंच लागतं ना? हे जे पलीकडे जाणं आहे ते मनाचंच आहे ना? दु:खांपलीकडे जाऊन कणखर झालेलं मनच त्या दु:खांकडे न भांबावता पाहू शकतं ना? त्यावर उपाय योजू शकतं ना? तेव्हा असं पलीकडे जाण्यासाठी मनाला जो शाश्वत, ठोस आधार लागतो तो केवळ परमभक्तीनंच प्राप्त होतो. संत सखूबाई काय, तुकाराम महाराज काय.. या सर्वानी तोच परमाधार मिळवला ना? तेव्हा हा जो परमाधार आहे त्याच्याकडे माउली ‘तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा’ म्हणून बोट दाखवत आहेत. आता हा बरवा, सहजसाध्य, आवाक्यातला विठ्ठल माझ्या जीवनात आला आहे खरा, पण तेवढय़ानं जीवन सुखाचं होणार आहे का हो? नाही! त्यासाठी आधी मी त्याला नीट पाहिलं पाहिजे. पूर्णपणे पाहिलं पाहिजे. या पाहण्याचाच संकेत म्हणजे ‘रूप पाहता लोचनी’!
कर्मेद्र – ठीक आहे दादा. समोर आहे ती मूर्ती नव्हे, तो साक्षात परमात्मा आहे, या भावनेनं मी मोठय़ा प्रेमानं त्याकडे पाहिलं. पण म्हणून तेवढय़ानं सुख मिळेल?
अचलदादा – अहो, पण हे पाहणं खरं पाहणं कुठलं? तुम्ही पाहूनही त्यांना पाहताच कुठे?
ज्ञानेंद्र – निसर्गदत्त महाराजांना एकानं विचारलं की, आम्ही तुमच्याकडे येतो तरी पूर्ण समाधानी का नाही? मन कायमचं नि:शंक का नाही? महाराज हसून म्हणाले, तुम्ही खऱ्या अर्थानं अजूनही आलेलाच नाहीत!
हृदयेंद्र – दादा मला आठवलं.. गोंदवल्यात समाधीवर अनुग्रहाची वेळ ठरलेली असते. एकदा आपण इलाहाबादला गुरुजींकडे गेलो होतो. मी त्यांना बालिश प्रश्न केला. मी विचारलं, गुरुजी या अनुग्रहाच्या वेळेत गोंदवलेकर महाराज खरंच तिथे असतात का हो?
अचलदादा – (हसत) हो गुरुजी खवळून म्हणाले, ते असतातच, तुम्ही असता का ते आधी सांगा!
हृदयेंद्र – अंगावर काटा आला पहा! आपण शरीरानंच हजर असतो, मनानं असतो का? गुरुजी मग समजावत म्हणाले, महाराज अखंड सर्वत्र आहेत, फक्त ते आहेत, हा माझा भाव क्षीण आहे. निदान तो अनुग्रहापुरता तरी टिकावा म्हणून ती वेळ आहे!
चैतन्य प्रेम