‘अ‍ॅन फ्रँकची डायरी’ मराठीतही आली आणि एका ज्यू कुटुंबातील मुलीचे तारुण्य हिटलरी छळापासून लपूनछपून राहताना कसे झाकोळले, याची ती कहाणी वाचून अनेक जण हेलावले. याच प्रकारचा जिवंत मरणाचा अनुभव कुमारवयातच राल्फ जार्दानो यांनाही घ्यावा लागला होता.. पण त्यांनी डायरी लिहिली नाही. खूप नंतर- १९८२ साली- ‘डी बेर्तिनीज’ ही जर्मन कादंबरी लिहिली; ती इंग्रजीतसुद्धा आलेली नाही. मात्र १० डिसेंबरला राल्फ जार्दानो यांच्या झालेल्या निधनाची दखल घेण्याचे कारण निराळेच आहे- त्यांचा निर्भीडपणा!
हाम्बुर्ग शहरात १९२३ रोजी ज्यू आई आणि सिसिलीतील (इटालियन) वडील अशा कुटुंबात राल्फ जन्मले. आई ज्यू, म्हणून ‘तू आमच्यात खेळायचे नाहीस’ असे दहाव्या वर्षी खेळगडय़ांकडून ऐकावे लागल्याचा पहिला ओरखडा ते कधीच विसरले नाहीत.. पुढे कैदेपासून बॉम्बफेकीपर्यंतचे आणि पौगंडावस्थेतच मरणभयाने लपून राहावे लागण्याचे अनुभव घेतल्यानंतरही नाही. ‘या युद्धानेच मला भीतीपासून मुक्ती दिली,’ असे ते म्हणत. पुढे हा मुक्त निर्भीडपणा अनेकदा दिसला. नवनाझीवादी प्रवृत्तींचा निषेध करण्यावर न थांबता जुन्या- १९४५ पर्यंतच्या नाझीवाद्यांनाही ‘आपला नाझीवाद कबूल’ करा, असे आवाहनच त्यांनी केले. आपण कधी काळी नाझीवादाकडे झुकलो होतो अशी कबुली ‘नोबेल’प्राप्त जर्मन लेखक गुंटर ग्रास यांनी २००६ साली दिली, तेव्हा त्यांच्या बचावाला धावले ते राल्फच! ‘त्या वातावरणात, बिगर-ज्यू तरुण आणखी काय करणार होते?’ असा प्रतिसवाल कुणाचीही भीड न बाळगता त्यांनी ग्रासविरोधकांना केला होता. याच राल्फ यांनी मुस्लीमविरोधी भूमिका घेतली. ‘युरोपात मोठय़ा मशिदी नकोत- हाम्बुर्गमध्ये तर नकोच’ असा आग्रह मांडला आणि बुरखाधारी मुस्लीम महिलांना ‘मानवी पेंग्विन’ म्हटले. यामागे ‘युरोपने लोकशाही समाजरचनेची जी मूल्ये मान्य केली आहेत, ती सर्वानी आपापले धर्म बाजूला ठेवून मानली पाहिजेत’ हा विचार होता आणि ‘जर्मन अथवा कोणताही युरोपीय समाज, मुस्लिमांना सामावून घेण्यात कमी पडला’ ही खंतही त्यांनी मांडली होती. केवळ निर्भीड असणे हे एकमेव मूल्य नसतेच. त्यामागे आणखी काही मूल्ये असतात, असावी लागतात, हे राल्फ यांच्या आचारविचारांतून दिसे.
तब्बल २३ पुस्तके लिहिणारे राल्फ पत्रकार होते. १९८८ पर्यंत त्यांनी पत्रकारिता केली, मध्येच पटकथा व दिग्दर्शनाचाही प्रयत्न केला. १९५५ साली कम्युनिझमकडे ओढले गेलेल्या राल्फ यांनी स्टालिनशाहीला वैतागून कम्युनिस्टांचा पर्दाफाश करणारे पुस्तक लिहिले आणि पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत आश्रय मिळवला; पण ही झाली त्या निर्भीडपणाची लौकिक बाजू.