स्वामी स्वरूपानंद संपादित ‘श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठा’च्या ७२व्या ओवीपासून जणू प्रत्यक्ष कृतीचा बोध आहे. मोक्षासाठीच माणसाचा जन्म झाला आहे, त्यामुळे प्रत्येकाला मोक्षासाठीच्या प्रयत्नांचा अधिकार आहे, मोक्षाचा उपाय केवळ भक्ती हाच आहे, या भक्तीचं माहात्म्य काय, ही भक्ती कशी सहजसाध्य आहे, त्यासाठीचा ‘अभ्यास’ नेमका काय आहे आणि तो कसा साधावा, त्या अभ्यासात मनाची साथ कशी मिळवावी, या भक्तीने परमतत्त्वाशी ऐक्य, एकरूपता कशी साधली जाते; याचं मार्गदर्शन ७२ ते १०० या ओव्यांत आहे. हाच आपल्या या सदराचाही ध्येयबिंदू आहे. ‘सकलांसी येथे आहे अधिकार’ अशी गर्जना करताना ‘नित्यपाठा’तील ओव्या सांगतात की, ‘‘तें चि भलतेणें भावें। मन मज आंतु येतें होआवें। आलें तरी आघवें। मागील वावो।। ७२।। (ज्ञा. अ. ९, ओवी ४५७). जैसे तंव चि वहाळ वोहळ। जंव न पवती गंगाजळ। मग होऊन ठाकती केवळ। गंगारूप।। ७३।। ’’ (अ. ९, ओवी ४५८). आता प्रचलित अर्थ असा की, भगवंत भक्ताला सांगतात, कोणत्याही उपायानं एकदा का तुझं मन माझ्या मनात आलं की तोवरच्या तुझ्या जीवनातील भलबुरं सारं व्यर्थ होऊन जातं. तुझे दुर्गुण, तुझे विकार, तुझ्या चुका जणू नाहीशा होतात. भगवंत रूपक वापरतात, की नदीनाल्याचं पाणी जोवर गंगेला मिळत नाही, तोवर त्याला कुणी गंगाजळ म्हणत नाही आणि जेव्हा ते गंगेला मिळतं तेव्हा ते गंगारूपच होतं. आता भक्ताला हव्या तेवढय़ा चुका करायला भगवंत परवानगी देत आहेत, असं कुणाला वाटेल. मात्र तुझं मन माझ्या मनात विलीन झालं की तुझ्यातलं सर्व वाईट आपोआप नष्ट होईल, एवढंच भगवंतांना सांगायचं आहे. भगवंताचं होऊनही जर मी चुका करीत असेन, तर माझं मन अजून भगवंतात विलीन झालेलं नाही, हे नि:संशय. या भूमीतले फकीर आणि संत कधी राजसत्तेला घाबरले नाहीत, पण म्हणून त्यांनी उद्दामपणे या सत्ताव्यवस्थेला अकारण आव्हानही दिलं नाही. कबीरांना मौलवी आणि पंडितांच्या सांगण्यावरून बादशहानं सुरुवातीला काय कमी छळलं? तरी सत्य उघड झाल्याशिवाय राहणार नाही, हे जाणणाऱ्या कबीरांनी सारं स्वीकारलं. ‘माझ्या अंगाला हात लावून दाखवा, माझी माणसं दंगे घडवतील,’ अशी धमकी या भूमीतल्या एकाही संतानं दिली नव्हती. कारण ते भगवंताशी खऱ्या अर्थानं एकरूप होते. तेव्हा खऱ्या भक्तिपंथाला लागेपर्यंत माझ्यात दुर्गुण असतीलही, पण मी जर खऱ्या अर्थानं त्याच्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करीत असेन तर जसजसा मी एकरूप होईन तसतशा माझ्यातल्या वाईट गोष्टी नष्ट होतील ना? आणि जेव्हा पूर्ण एकरूपता साधेल तेव्हा मागचं काही शिल्लक राहील का हो? तेव्हा, ‘‘तें चि भलतेणें भावें। मन मज आंतु येतें होआवें। आलें तरी आघवें। मागील वावो।।’’ या ओवीत ‘आघवे’ शब्दाला महत्त्व आहे. माझं अवघं मन त्याच्यात विलीन झालं तरच मागचं सारं निर्थक होतं! तर ‘मागील’चा एक अर्थ म्हणजे मागच्या चुका, आता ‘मागील’चा दुसराही अर्थ आहे आणि तो अधिकच चपखल आहे, तो पाहू.