वयाच्या नव्वदीनंतरही रोमारोमात भिनलेले नृत्य ठरवूनही पुसून टाकता येत नाही. गात्रे मंद झाली, तरी मनात नृत्याचे सौंदर्यपूर्ण आकार आणि उकार तेवढय़ाच ठसठशीतपणे उभे राहतात. कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांच्या बाबतीत हे असे घडले. त्यामुळे मृत्यू समीप येत असतानाही, त्यांना त्यांचे नृत्यच खुणावत राहिले होते. त्यांचे नृत्याच्या परिघात येणे हीच एक सामाजिक क्रांती होती. पुरुषप्रधान समाजाने स्त्रीला समाजातील कोणत्याही स्तरावर बाहेर येण्यासच बंदी घातलेली असताना सितारादेवी यांचे वडील सुखदेव महाराज यांनी या कन्येला नृत्यशिक्षण देण्यास सुरुवात केली. कथ्थक ही जरी अभिजात नृत्यशैली, तरीही ते सादर करण्यास कुलीन घरातील मुलींना समाजमान्यता नव्हती. अशा वेळी परगावी जाऊन राहण्याचे धैर्य सुखदेव महाराज यांनी दाखवले नसते, तर आज लाखो मुली कथ्थक शैलीचे शिक्षण घेऊ शकल्या नसत्या. सितारादेवी भाग्यवान खऱ्याच. कारण त्यांना अगदी लहान वयात रवींद्रनाथ टागोर यांच्यासमोर नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. टागोरांच्या आग्रहावरून त्यांनी नृत्यात आणखी काही प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि जवळपास नऊ दशके पदन्यास आणि विभ्रमांचा प्रवास सुरू झाला. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्तरेकडील नृत्यप्रकाराला राजाश्रयामुळे समाजातही प्रतिष्ठा मिळाली. परंतु नृत्याचे सार्वजनिक कार्यक्रम सुरू होण्यास मात्र बराच कालावधी जावा लागला. कथ्थक या शब्दातच कथा सामावली आहे. कथा सांगायची, तर ती नृत्यातून. शरीराच्या प्रत्येक अवयवाला सौंदर्यपूर्ण व कलात्मक पद्धतीने सादर करून एक देखणा आविष्कार सादर करणाऱ्या या शैलीतही अनेक घराणी आहेत. त्या प्रत्येकाचा खास लहेजा आहे आणि त्यातून सांगायचे जरी एकच असले, तरी पद्धती मात्र निरनिराळ्या आहेत. सितारादेवी यांनी आपल्या अंगी असलेल्या सर्जनशीलतेचा पुरेपूर फायदा घेतला आणि कथ्थकमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग केले. उत्तरेत आजही नृत्य या प्रकाराला सांस्कृतिक जगात महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्राने संगीताला जवळ केले आणि नृत्याकडे जरासा काणाडोळाच केला. अशाही स्थितीत सितारादेवी मुंबईत आल्या. चित्रपट बोलू लागल्यानंतर त्यामध्ये संगीताची जागा अनन्यसाधारण होती. संगीताबरोबर नृत्य ही तर अत्यावश्यक बाब ठरली. अशा काळात सितारादेवी यांनी चित्रपटांमधून अनेक उत्तम आविष्कार दिले आणि कथ्थकच्या प्रसाराला मोठा हातभार लावला. ‘वतन’ आणि ‘नज्म्म’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि नंतरच्या काळात ‘मदर इंडिया’ या चित्रपटातील त्यांचे नृत्य संस्मरणीय ठरले. चित्रपटाच्या दुनियेत दंग झाल्याने आपल्या नृत्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे लक्षात आल्यावर साठच्या दशकात त्यांनी रुपेरी पडद्यावरून निवृत्ती घेतली आणि कथ्थक नृत्यासाठीच पूर्णवेळ वाहून घ्यायचे ठरवले. देशात आणि परदेशातील त्यांचे कार्यक्रम ही त्यांच्या लौकिक यशाची पावती. साहजिकच पुरस्कार त्यांच्या मागे न धावते, तरच नवल! पण सितारादेवी यांना आपल्या कलेबद्दल कमालीचा अभिमान होता. त्यामुळे पद्मभूषण पुरस्काराला नकार देताना आपल्याला भारतरत्नच मिळायला हवे, अशी जाहीर मागणी करण्यासही त्या कचरल्या नाहीत. महाराष्ट्रातील कथ्थकच्या प्रसारातील आणि मराठी माणसाच्या सांस्कृतिक जगात या नृत्याला स्थान मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. समाजात महिलांना नृत्याच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळण्यासाठी आयुष्यभर प्रयत्नशील राहिलेल्या सितारादेवी यांना नव्या काळात पुरुषांपेक्षा स्त्री-कलावंतांची संख्या वाढत असल्याचे पाहून निश्चितच आनंद झाला असणार. त्यांच्या निधनाने कथ्थकच्या कथासंग्रहातील एक दीर्घकथा संपली आहे.