सतराव्या शतकातील पारंपरिक कर्मठ ब्राह्मण कुटुंबातील एक मुलगी तुकोबांसारख्या ब्राह्मणांकडून शूद्र मानल्या गेलेल्या संतांचे शिष्यत्व, पतीच्या व स्वजातीयांच्या विरोधाला न जुमानता पत्करते, वाक्यरचना करू लागते आणि बघता बघता तिची मजल ‘वज्रसूचि’वर भाष्य करण्यापर्यंत जाते हा प्रकारच अद्भुत आहे हे खरे. पण त्यासाठी ‘शाक्त’ वगैरे बाहेरच्या भानगडीत पडायची गरज नाही.

महाराष्ट्रातील सामाजिक समतेच्या लढय़ात अलीकडच्या काळात कॉ. शरद् पाटील यांचे नाव ठळकपणे उठून दिसते. ब्राह्मणेतर चळवळीशी संबद्ध असलेल्या घराण्याची पाश्र्वभूमी लाभलेल्या शरद् पाटलांना त्या sam02चळवळीची व्याप्ती जातीय समतेपुरती असल्याचे वाटल्याने असेल किंवा अन्य कोणत्या कारणाने असेल, पाटील समतेसाठी व्यापक वर्गलढा उभारणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाकडे आकृष्ट झाले. पण तेथे वर्गविषमतेवर अधिक भर दिला जाऊन जातीय विषमतेकडे दुर्लक्ष होते, असा अनुभव आल्यावर ते साम्यवादी चळवळीत जात्यंधाची भाषा बोलू लागले. पण मार्क्‍सवादी विज्ञानाच्या चौकटीत जातीच्या भाषेला थारा नाही, हे लक्षात आल्याने मार्क्‍सवाद्यांवर वर्गाधळेपणाचा आरोप करीत ते वेगळे विश्लेषण करू लागले आणि परिणामत: त्यांची पक्षातूनच हकालपट्टी झाली. दरम्यान, त्यांना स्त्री-पुरुष – म्हणजेच लिंगविषमतेच्या समस्येचीही जाणीव होऊन त्यांनी वर्ग आणि जाती यांच्या अंताबरोबरच  स्त्रीदास्यंताची चळवळही व्हायला हवी असा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना मार्क्‍सवाद्यांनी केलेल्या आदिम समाजाच्या विश्लेषणाला आव्हान द्यावे लागले.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
What DCM Devendra Fadnavis Said About Nana Patole?
नाना पटोलेंच्या कार अपघातावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, “महाराष्ट्राच्या राजकारणात…”

कॉ. शरद् पाटलांच्या वैचारिक स्थित्यंतराचा तपशीलवार इतिहास सांगण्याचे हे स्थळ नव्हे आणि ते माझे उद्दिष्टही नाही. महाराष्ट्रातील स्त्रियांच्या स्थितीगतीची चर्चा आपल्याला करायची आहे. वर्ग, वर्ण, जाती आणि लिंगभाव यांच्या विषमतेतून निष्पन्न होणाऱ्या दास्याचा अंत घडवून आणण्यासाठी करावयाच्या चळवळीला तात्त्विक अधिष्ठान प्राप्त व्हावे यासाठी त्यांची धडपड होती. यासाठी मार्क्‍सवाद, फुलेवाद, आंबेडकरवाद अशी प्रचलित तत्त्वज्ञाने किंवा त्यांचे समन्वय पुरेसे ठरत नाही या निष्कर्षांवर येऊन त्यांनी हा सैद्धांतिक प्रपंच केला. तो करताना आपली स्वत:चीच आधीची मते सोडून नवी मते मांडण्यात त्यांना कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटला नाही. विचारांच्या द्वंद्वात्मक विकासाचा पाटील चालताबोलता नमुनाच म्हणावा लागतो. या प्रक्रियेत पाटलांना प्रचलित समजुतीमध्ये उत्पाती म्हणता येईल, अशी उलथापालथ घडवून आणखी स्वैराचारी म्हणून बदनाम ठरलेल्या शाक्त तंत्राकडे त्यांनी अगदी वेगळ्या दृष्टीने पाहिले. शाक्त तंत्र त्यांना जाती आणि स्त्रीदास्य यांचा अंत घडवून आणणारा विज्ञानपूर्व मार्ग वाटला.
शाक्तांच्या उपासनेत मद्यमांसमैथुनादी पंच मकारांवर भर दिला जातो. पाटलांनी त्यातील मैथुनावर लक्ष केंद्रित केले. जातीय विषमता स्त्री-पुरुषसंबंधातूनही व्यक्त होत असते. हे संबंध शक्यतो स्वजातीपुरते मर्यादित ठेवण्याचा आग्रह असे. शाक्तपंथाने उच्चवर्णीय पुरुषाने नीच जातीच्या स्त्रीबरोबर संबंध ठेवायला नुसती मुभाच नव्हे तर उत्तेजन दिले. तो त्यांच्या धार्मिक विधीचा मुख्य भाग बनला. पाटलांना हा एक जातिमुक्त समाजाचा प्रयोगच वाटला. ब्राह्मण पुरुषाने अस्पृश्य स्त्रीशी अशा प्रकारचा संबंध ठेवणे हे एक मोठेच क्रांतिकारक पाऊल असल्याचे त्यांना वाटले.

वैचारिक प्रवासात आपण आपले सिद्धांत घेऊन पुढे जात असतो. त्यात असे सिद्धांत ज्याला सुचतात, त्या प्रतिभावान वैज्ञानिकाला महत्त्व द्यावेच लागते. तथापि, खुद्द मार्क्‍सच्याच परात्मतेच्या (ं’्रील्लं३्रल्ल) सिद्धांताचा उपयोग करून सांगायचे झाल्यास कधी कधी एखादा सिद्धांत इतका प्रभावी ठरतो, की तो आपल्या स्फुरणकर्त्यांच्या हातून निसटून त्याच्यावरच सत्ता गाजवू लागतो! सिद्धांतानी प्रतिभावंत वैज्ञानिकाच्या मागे जाण्याऐवजी तो स्वत:च आपल्या सिद्धांताच्या मागे फरफटत जाऊ लागतो. त्याचा सिद्धांत त्याच्या डोक्यावर बसतो. शाक्त तंत्राच्या संदर्भात पाटलांचे असेच काहीसे झाले असावे. वस्तुत: शाक्त तंत्र म्हणजे उच्चजातीय पुरुषांनी कनिष्ठ जातीच्या स्त्रियांचे धर्मसाधनेच्या नावाने केलेले शोषण आहे. त्याने जातीचा अंत कसा होईल हे समजत नाही. एके काळी समाजात असे अनुलोम संबंध वैधच मानले जात असत. क्रांती किंवा बंडखोरीच मानायची असेल, तर खालच्या जातीच्या पुरुषाने वरच्या जातीच्या स्त्रीचा उपयोग ‘मुद्रा’ म्हणून केला तर कदाचित मानता येईल. पण शाक्तांना ते मान्य नाही. खरे तर कोणत्याही स्त्रीचा साधन म्हणून असा उपयोग करणे हेच मुळी स्त्री-पुरुषविषमतेचे व पुरुष श्रेष्ठत्वाचे द्योतक आहे आणि दुसरे असे, की अगदी पाटील म्हणतात, त्या चौकटीत विचार केला, तरी सर्वात खालच्या जातीच्या पुरुषाला शाक्त मार्गात मोक्ष मिळणे शक्यच नाही. कारण त्या साधनेसाठी त्याला त्याच्या जातीपेक्षा खालच्या जातीची स्त्री उपलब्ध असावी लागेल. पण त्याच्या जातीपेक्षा कनिष्ठ जातच अस्तित्वात नसल्याने त्याला या जन्मात तरी मोक्ष मिळणार नाही. संशयाचा फायदा देऊन कोणी शाक्तांवरील अनैतिकतेचा आरोप नाकारला व ती खरोखरच मोक्षप्राप्तीसाठी करण्यात येणारी अध्यात्मसाधना होती असे मानले, तरीसुद्धा ही साधना उच्चवर्णीय पुरुषांसाठी होती व त्यासाठी ते खालच्या जातीच्या स्त्रियांचा उपयोग करीत होते, हे कसे नाकारणार?

आपल्या सिद्धांताचे उपयोजन करण्यात कमालीचे सातत्य व तर्कनिष्ठा ठेवणाऱ्या पाटलांनी आपला हा शाक्त सिद्धांत शिवकालीन इतिहासालाही लावला. इ.स. १६७४ साली गागाभट्टाने शिवाजी महाराजांचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केला. त्यानंतर थोडय़ाच काळात महाराजांनी निश्चलपुरी या पंडिताकडून तांत्रिक पद्धतीने अभिषेक करवून घेतला. पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे तांत्रिक अभिषेकात क्षत्रिय राजाने अस्पृश्य जातीच्या स्त्रीशी विवाह करून तिला राणी करायचे असते. आता ज्या अर्थी महाराजांनी असा राज्याभिषेक केला, त्या अर्थी त्यांनी अस्पृश्येशी विवाह केला असणारच. परंतु, त्यांनी तसे काही केल्याची नोंद आढळत नाही. पाटलांच्या मते ही ब्राह्मणी इतिहासकारांनी केलेली चलाखी होय.
जातिभेद आणि लिंगभेद यामुळे निर्माण झालेल्या दास्याचा अंत घडवून आणण्याची कॉ. पाटलांची प्रेरणा अस्सल होती व तळमळही पराकोटीची होती, यात शंका नाही. पण सैद्धांतिक उत्साहाच्या पोटी त्यांनी शाक्त तंत्राचे अवाजवी उदात्तीकरण केले. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे तांत्रिक अभिषेकात महाराजांची पत्नी झालेली अस्पृश्य स्त्री संस्कृत पंडितही होती. आता अस्पृश्य स्त्रीला संस्कृतचे अध्ययन करायची संधी कशी आणि कोठे मिळाली, असा प्रश्न उपस्थित होणारच आणि सैद्धांतिक संगतीचे सातत्य राखायचे असेल, तर त्याचे उत्तरही द्यावेच लागणार. पाटलांसाठी ते अवघड नाही. त्यांनी या स्त्रीला संस्कृत पंडित बनवण्याची कामगिरी संत तुकारामशिष्या बहिणाबाई सिऊरकर यांच्याकडे सोपवली. बहिणाबाई ब्राह्मण असल्याने त्यांना संस्कृत ज्ञान असणे हे असंभाव्य नाही. तथापि, अस्पृश्यतेच्या सहवासात राहून तिला संस्कृत शिकवण्यासाठी लागणारे धैर्य त्या कोठून आणणार? पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे त्या शाक्त पंथाच्या होत्या. म्हणून हे शक्य झाले. पण बहिणाबाई तर तुकोबांच्या शिष्या. पण त्याने बिघडते? तुकोबांनाही शाक्त करून टाकले की झाले.

मुद्दा असा आहे, की तुकोबांचे (आणि बहिणाबाईंचेही) शाक्तांच्या अनाचारावर टीका करणारे अभंग उपलब्ध आहेत. त्यांचे काय? दोन शक्यता सांगता येतात. एक तर ते अभंग त्यांचे नाहीतच. त्यांच्या नावे करण्यात आलेले ते ब्राह्मणी प्रक्षेप होत किंवा ते ज्या शाक्तांवर टीका करतात ते ब्राह्मणी शाक्त होते. त्यांनी अनाचार करून जात्यंधक अब्राह्मणी शाक्तांची बदनामी केली.

मुळात पाटलांना बहिणाबाई आणि शिवरायांची कथित अस्पृश्य पत्नी यांचा संबंध जोडावासा वाटला याचे कारण म्हणजे ज्या जातिव्यवस्थेची आणि तदंतर्गत ब्राह्मण श्रेष्ठत्वाची पाटलांना अर्थातच समर्थनीय चीड आहे आणि जी लवकरात लवकर निकालात काढण्यास ते सज्ज आहेत, तिची कठोर समीक्षा करणारी मराठी कृती बहिणाबाईंनी रचली होती. बौद्ध तत्त्वज्ञ अश्वघोष यांच्या ‘वज्रसूचि’ या मूळ संस्कृतरचनेचा बहिणाबाईंनी मराठीत अभंगानुवाद केला. या दृष्टीने त्या पाटलांच्या आणि एकूणच पुरोगाम्यांच्या जातकुळीच्या ठरतात. सतराव्या शतकातील पारंपरिक कर्मठ ब्राह्मण कुटुंबातील एक मुलगी तुकोबांसारख्या ब्राह्मणांकडून शूद्र मानल्या गेलेल्या संतांचे शिष्यत्व, पतीच्या व स्वजातीयांच्या विरोधाला न जुमानता पत्करते, वाक्यरचना करू लागते आणि बघता बघता तिची मजल ‘वज्रसूचि’वर भाष्य करण्यापर्यंत जाते हा प्रकारच अद्भुत आहे हे खरे. पण त्यासाठी ‘शाक्त’ वगैरे बाहेरच्या भानगडीत पडायची गरज नाही. ‘स्त्रीजन्म म्हणोनि न व्हावे उदास’ असा दिलासा देणाऱ्या-घेणाऱ्या जनाबाईंच्या परंपरेशी सुसंगत असेच बहिणाबाईंचे हे पुढचे पाऊल आहे. ‘वेद देती हाका पुराणे गर्जती। स्त्रियेच्या संगती हित नोहे।। मी तो सहजचि स्त्रियेचाचि देह। परमार्थाची सोय आता कैसी?’ अशी जिची परंपरेने कोंडी केली होती, त्या स्त्रीचा ‘वज्रसूचि’पर्यंतचा प्रवास ‘बहिणीस भेटला तुका। महावाक्य झाले फुका।।’ यामुळे शक्य झाला. म्हणजे तुकोबा या एकटय़ा व्यक्तीमुळे नव्हे तर ते ज्या संप्रदायाचे होते त्यामुळेदेखील! एकीकडे स्त्रियांना शूद्रांच्या पंगतीत बसवून त्यांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारणारी कर्मठ सनातनी परंपरा आणि दुसरीकडे तिला पुरुषांच्या भोगाचे व मोक्षाचे साधन म्हणून वापरून तिचे शोषण करणारी वृत्ती यांच्या पाश्र्वभूमीवर विचार केला, तर महाराष्ट्रातील या वेगळ्या परंपरेचे वैशिष्टय़ लक्षात यायला हरकत नाही. इतिहास एवढा सरळ व स्पष्ट असताना वाकडय़ा वाटेने जायची व त्यासाठी विद्वत्ता आणि व्यासंग पणाला लावायची गरजच काय?

*लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’ हे सदर