आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे म्हणवल्या गेलेल्या जवळपास सर्वच देशांनी तात्कालिक  यशासाठी व्यवस्थेबाहेरील गटांना शस्त्रपुरवठा केला. यास अमेरिका अधिक जबाबदार, भारत कमी. इतकाच फरक. पण यातून दहशतवादाचे जे जागतिकीकरण झाले, त्याचे कटू फळ म्हणजे मलेशियाचे प्रवासी विमान पाडले जाण्याची दु:खद घटना.
युक्रेनी वा रशियावादी बंडखोरांनी ज्या अस्त्राच्या साह्य़ाने मलेशियाचे प्रवासी विमान पाडले ते क्षेपणास्त्र हे भारतीय नौदलाचे प्राथमिक हत्यार आहे, यावरून दहशतवाद्यांची मजल कोठपर्यंत गेली आहे, याचा अंदाज यावा. याचा अर्थ हा की पूर्ण नियंत्रित अशा भारतासारख्या लोकशाही देशाच्या संरक्षण व्यवस्थेत जे अस्त्र आहे तेच अस्त्र नियंत्रणशून्य अशा दहशतवाद्यांकडेदेखील आहे. हे वास्तव सुज्ञांचा थरकाप उडवण्यास पुरेसे आहे. या पाडल्या गेलेल्या विमानाचा लष्कराशी काहीही संबंध नव्हता आणि त्यातील प्रवासी दुरान्वयानेदेखील कोणत्याही देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी निगडित नव्हते. या विमानातील सर्वाना मरताना आपला प्राण का घेतला जात आहे, असा प्रश्न पडला असेल. मानवाच्या उत्क्रांत अवस्थेतील हा सर्वात दुर्दैवी क्षण म्हणावयास हवा. संस्कृतीच्या आदिम अवस्थेत माणसांनी केवळ चूष म्हणून अभागींचा जीव घेणे घडत होते. त्या हत्यांना काहीही कारण नसायचे. तेथपासून संस्कृतीचे उन्नतीकरण होत गेले असे मानले जाते. परंतु मलेशियाच्या विमानाचे प्राक्तन पाहता या दाव्याबाबत प्रश्न पडावा. विज्ञान, तंत्रज्ञानापासून ते जगण्याच्या साधनांच्या आधुनिकीकरणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे नवनवे आयाम पाहावयास मिळत असताना माणसांची अकारण हत्यादेखील होत असेल तर या व्यवस्थेविषयी काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. युक्रेनच्या भूमीवर जे काही घडले त्यामुळे हे प्रश्न समस्त मानवजातीसमोर आ वासून उभे ठाकले असून कोणाही विचारी व्यक्तीस त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुर्दैव हे की जे काही घडले त्याच्या कारणांचे सुलभीकरण होऊ लागले असून या सर्वास आपण कसे जबाबदार नाही, हेच दाखवण्याकडे सर्वाचा.. यात भारतीयदेखील आले.. कल दिसतो. परंतु हे वास्तव नव्हे. त्याचा प्रामाणिकपणे वेध घेतल्यास जे काही झाले त्या पापाची नोंदणी सर्वाच्याच खात्यात होणार आहे, याची जाणीव असावयास हवी.
याचे कारण असे की जवळपास आघाडीच्या सर्वच देशांनी क्षुद्र वा तात्कालिक फायद्यासाठी व्यवस्थेबाहेरील गटांना शस्त्रपुरवठा केल्याचा इतिहास आहे. युक्रेनमधील ही दुर्घटना रशियाने फुटीरतावाद्यांना पोसल्यामुळे झाली, सबब रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे यास जबाबदार आहेत, अशा अर्थाचे निवेदन अमेरिकेतर्फे केले जात आहे आणि जागतिक राजकारणाकडे डोळसपणे न पाहणारे अमेरिकेचीच री ओढत आहेत. अमेरिकेचा दावा हे अर्धसत्य आहे. या सत्याच्या उरलेल्या भागात अमेरिकेचाही समावेश होतो. गेल्याच वर्षी अमेरिकेच्या नौदलाकडूनही असाच भयंकर प्रमाद घडला होता. पर्शियन आखातातील अमेरिकी नौदलाने इराणचे प्रवासी विमान काहीही कारण नसताना पाडले. त्याचा फार बभ्रा झाला नाही. याचे कारण माध्यमांचे अमेरिकीकरण. कुत्र्यास एकदा वेडा ठरवले की त्यास मारणे समर्थनीय ठरते, अशा अर्थाची इंग्रजी म्हण आहे. जागतिक राजकारणात असे अनेक कुत्रे अमेरिकेने वेडे ठरवले असून त्यांना ठार करण्याचा अधिकार स्वत:कडे घेतला आहे. आज रशियास दोषी ठरवणाऱ्या अमेरिकेची गतसाली इराणी विमानावर चुकून झालेल्या हल्ल्याबाबत काय भूमिका होती? ही घटना घडली त्याच्या आधी सुमारे चार दशके याच अमेरिकेने कम्युनिस्टांचा लाल प्रवास रोखण्यासाठी पूर्व युरोप आणि पश्चिम आशियातील अनेक मुक्त संघटनांना शस्त्रपुरवठा करून खतपाणी घातले, ते कृत्य नैतिक होते काय? अमेरिकेचे तत्कालीन सुरक्षा सल्लागार झिबिग्न्यु ब्रेझन्स्की यांनी अधिकृतपणे या धोरणाचा पाठपुरावा केला आणि शीतयुद्धाच्या काळातील सोविएत युनियनचा प्रभाव रोखण्यासाठी त्या देशातील मुसलमानबहुल देशातील धर्मवाद्यांना हाताशी धरले हा इतिहास आहे. आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान आदी देशांतील इस्लामी धर्माधांना अमेरिकेची थेट मदत होती. आजमितीला या परिसरात निर्माण झालेल्या दहशतवादाच्या भस्मासुराचा उगम हा त्या मदतीमध्ये आहे, हे अमेरिका अमान्य करणार काय? हा सगळा परिसर खनिज संपत्तीने समृद्ध आहे. ही संपत्ती आपल्या विरोधी असलेल्या सोविएत रशियाच्या हाती जाता नये, हेही उद्दिष्ट त्यामागे होते, हे कसे नाकारणार? इतकेच काय रशियाच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेल्या आणि रशियाच्या उंबरठय़ावर असलेल्या जॉर्जिया या देशातील ओसेशिया आणि अबकाझिया प्रांतात २००८ साली झालेल्या हिंसक उठावामागेही अमेरिकेचा हात होता, याकडे डोळेझाक करणार काय? हा उठाव चिरडण्यासाठी रशियाने बळाचा वापर केला. त्या वेळी रशियाविरोधी बंडखोरांना अमेरिकेनेच मदत केली होती, याकडे कसे दुर्लक्ष करणार? सध्याच्या युक्रेनी संघर्षांतही हेच घडत आहे. त्या देशाचे रशियावादी अध्यक्ष यानुकोविच यांच्या विरोधात उठाव करू पाहणाऱ्या युक्रेनींना अमेरिका आणि नाटोच्या देशांनी उघड मदत केली आणि शस्त्रास्त्रे पुरवली. त्या वेळी क्रायमिया या रशियाप्रेमी प्रांतातील बहुसंख्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले गेले. जे आपल्या धोरणांना पाठिंबा देतील ते प्रामाणिक लोकशाहीवादी आणि आपल्या शत्रूच्या, किंवा रशियाच्या बाजूने उभे राहतील ते अप्रामाणिक, हुकूमशाहीवादी अशी अमेरिकेची विभागणी होती. ज्याप्रमाणे अमेरिकेने रशियाविरोधी बंडखोरांना शस्त्रास्त्रे पुरवली त्याप्रमाणे रशियाने आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांना सशस्त्र केले. असा हा लढा आहे. याचेच स्वरूप कमीअधिक प्रमाणात जगात ठिकठिकाणी पाहावयास मिळते. सीरिया हे याचे उदाहरण. सीरियाचे अध्यक्ष बशर असाद हे बदमाश आहेत, याबाबत कोणाचेही दुमत नाही. ही बदमाशी वडिलोपार्जित आहे. त्यांचे वडील हफीझ अल असाद हे इतकेच, किंबहुना अधिकच, रक्तपिपासू होते. हे असाद जोपर्यंत पाश्चात्त्यांच्या तालावर नाचत होते, तेव्हा त्यांच्या क्रौर्याविषयी कोणाचीच तक्रार नव्हती. बशर असाद यांनी अमेरिकादी देशांपासून फारकत घेतल्यानंतर त्यांच्याविरोधातील सीरियन बंडखोरांना अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे पुरवली जात असून त्यांच्या वापराने निरपराध्यांनाच प्राण गमवावे लागत आहेत. इस्रायलचा नृशंस वरवंटा ज्या वेळी पॅलेस्टाईन भूमीवर फिरत असतो तेव्हा त्यातील शस्त्रास्त्रेदेखील अमेरिकेच्या मदतीनेच पुरवली गेलेली असतात, हे वास्तव कसे नाकारणार? इतकेच काय श्रीलंकेतील तामिळ बंडखोरांना सुरुवातीच्या काळात भारताने अशीच शस्त्रास्त्रे पुरवली होती आणि त्यातून निरपराध सिंहलीच मारले गेले होते, ते पाप आपले नाही असे आपण म्हणणार काय? पंजाबातील राजकारणाचे डावपेच म्हणून जर्नेलसिंग भिंद्रनवाले याला सुरुवातीच्या काळात कै. इंदिरा गांधी यांनीच खतपाणी घातले होते, ही बाब कमी गंभीर कशी मानणार? विविध देशांच्या या आणि अशाच भूमिकेतून एके ४७ सारखी जहाल शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडत गेली. आज परिस्थिती अशी की अनेक देशांच्या अधिकृत सैन्याकडे जितकी आधुनिक शस्त्रे नाहीत त्याच्या कित्येकपट अद्ययावत संहारक शस्त्रास्त्रे फुटीर, सैल दहशतवादी गटांच्या हाती आहेत. ही प्रक्रिया जेव्हा सुरू झाली त्या वेळी त्याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही. तेव्हा आता वास्तव एक पाऊल पुढे गेले असून दहशतवाद्यांच्या हाती विमानवेधी तोफा आणि अस्त्रे पडू लागली आहेत. जे काही घडत होते, त्याची परिणती अशीच होणार होती.
याचा थेट अर्थ हा की आजमितीला या दहशतवादाचे पूर्ण जागतिकीकरण झाले असून त्यास सर्वच देश कमीअधिक प्रमाणात जबाबदार आहेत. इतके दिवस या जागतिकी दहशतवादाचा फटका मर्यादित वा विशिष्ट प्रदेशातील जनतेलाच बसत होता. आता त्याची झळ सर्वानाच बसू लागली आहे. कारण या दहशतवादाचेदेखील विकृत अर्थाने लोकशाहीकरण झाले असून तो विकेंद्रित झाला आहे. अशा परिस्थितीत जगाचे नेतृत्व करणाऱ्यांनी एकत्र येऊनच समंजसपणे हे आव्हान पेलावयास हवे आहे. ही चूक जशी कोणा एकाच देशाची नाही तसेच त्यावरील उत्तरही कोणा एकाच देशाकडे नाही. ते सामुदायिकपणेच शोधावे लागेल. नपेक्षा आज   एमएच १७ विमान पडले. उद्या अन्य कोणतेही पडेल, इतकेच.