वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघामध्ये मानधनावरून उठलेले वादळ, बीसीसीआयने त्यानंतर या संघाशी घेतलेला मालिकाविरामाचा निर्णय आणि त्यानंतरची त्यांची शरणागती या सर्व घटनांतून क्रिकेटविश्वातील गरीब आणि श्रीमंत ही दरी किती वाढत चालली आहे याची प्रचीती तर येतेच, परंतु बळी तो कान पिळी हे तत्त्व अन्यांप्रमाणे या क्षेत्रासही लागू होते हेही या घटनाक्रमातून सिद्ध होते. जागतिक क्रिकेटच्या तिजोरीची चावी आजमितीला भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन राष्ट्रांकडे आहे. अर्थसत्तेपाठोपाठ आपोआपच निर्णयसत्ताही येते. एकंदर परिस्थिती अशी की झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांसारख्या क्रिकेटच्या नकाशावरील गरीब राष्ट्रांना या तीन राष्ट्रांपुढे मान तुकवण्याशिवाय पर्याय नाही. वेस्ट इंडिज प्रकरणातून हेही सुस्पष्ट झाले आहे. २००५ मध्ये पुरस्कर्त्यांसंदर्भात खेळाडू आणि मंडळ यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला होता, ख्रिस गेल स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असला तरी तसा शांत स्वभावाचा; पण त्यानेही २०११ मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाशी पंगा घेतला. परिणामी वर्षभर तरी त्याला राष्ट्रीय संघापासून दूर ठेवण्यात आले. मुळात हा प्रश्न वेस्ट इंडिजमध्येच त्यांनी सोडवायला पाहिजे होता; परंतु सामन्याच्या मानधनात ७५ टक्के कपातीची कुऱ्हाड या संघावर भारतात पोहोचल्यावर कोसळली. यात वेस्ट इंडिज प्लेअर्स असोसिएशनचा प्रमुख वॉव्हेल हाइंड्सने विश्वासघात केल्याची चर्चा आहे. कोचीच्या पहिल्याच सामन्याआधी वेस्ट इंडिजचा संघ दौरा सोडणार अशी कुणकुण होती; परंतु भारतीय क्रिकेटच्या धाकामुळे ही मालिका अक्षरश: चार सामन्यांपर्यंत खेचण्यात आली. अखेर धरमशाला येथे असंतोषाची ठिणगी पेटली. वेस्ट इंडिज संघाने तडकाफडकी मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीसीसीआयने वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाशी मालिकाविराम घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आणि वाटाघाटीसाठी त्यांनी शरणागती पत्करली. आता एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदसुद्धा वेस्ट इंडिजवर निलंबनाची कारवाई करण्याच्या विचारात आहे.  विश्वचषक काही महिन्यांवर आला असताना विंडीजला  ही हद्दपारी परवडणारी नाही. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंचे नशीब बलवत्तर म्हणून बीसीसीआयने त्यांना आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेटपासून खेळण्यास बंदी घातली नाही. अन्यथा, आधीच आर्थिक कोंडीत असलेल्या क्रिकेटपटूंचे हाल विचारणारा कुणीच राहिला नसता. याच विंडीजची मक्तेदारी झुगारून भारतीय संघाने १९८३ मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर परिसस्पर्श लाभल्याप्रमाणे भारतीय क्रिकेटचे दिवस बदलले. जगमोहन दालमिया, शरद पवार, श्रीनिवासन यांच्यासारखी मंडळी जागतिक क्रिकेटमधील सत्ताधीश म्हणून उदयाला आली. काही वर्षांपूर्वी आयपीएल नामक सोन्याची अंडी देणारी कोंबडी भारतीय क्रिकेटला मिळाली. त्यामुळे भारतात क्रिकेटपटूंना आर्थिक सुबत्ता आली.  क्रिकेटमधील अन्य गरीब राष्ट्रांच्या चांगल्या खेळाडूंनासुद्धा आयपीएलने सुखसमृद्धीचे आर्थिक बळ दिले आहे. त्यामुळेच तर गेल, ड्वेन ब्राव्हो, सुनील नरिन, किरॉन पोलार्ड यांच्यासारख्या खेळाडूंना आयपीएलपासून दूर ठेवणे जसे बीसीसीआयला परवडणार नाही, तसेच खेळाडूंचेही आता राष्ट्रीय क्रिकेटशिवाय काही अडत नाही, अशी एक मानसिकता विकसित झाली आहे. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटपटूंना आणि अन्य राष्ट्रांना मांडलिक केले आहे, तर परदेशातील खेळाडूंना आर्थिक गुलामगिरीत आणून बंडखोरीचे बळ दिले आहे. तूर्तास तरी गरीब बिच्चाऱ्या वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे भवितव्य अधांतरी आहे.