केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष बोलावून त्यांच्या चुकीच्या कृत्याबद्दल जाब विचारल्याचे वृत्त प्रसिद्ध होण्यास कोण कारणीभूत ठरले, हा सध्या सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. जीन्स घालून कोणता मंत्री कुठे गेला आणि कोणता मंत्री कोणाला कुठे आणि का भेटला, अशा प्रकारच्या प्रश्नांच्या सरबत्तीने नरेंद्र मोदी यांनी आपल्या सहकाऱ्यांवर कसे बारीक लक्ष ठेवले आहे, असे सांगणाऱ्या अनेक बातम्या सध्या पसरवल्या जात आहेत. पोलीस खात्यातील कुणा अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी पंकज सिंह यांनी रदबदली केल्याच्या प्रकरणी मोदी यांनी त्यांची चांगलीच हजेरी घेतल्याचे हे वृत्त मोदींची प्रतिमा चकचकीत करणारे असले, तरी सत्तेतील भाजपमध्ये सगळे आलबेल नाही, असेही सुचवणारे आहे. माध्यमांकडे अशा बातम्या भाजपच्याच गोटातून आल्याची चर्चा सुरू झाल्याने तर भाजपअंतर्गत असलेली सुंदोपसुंदी उजेडात येऊ लागली आहे. राजनाथ सिंह यांनी या प्रकरणी खुलासा करताना त्यात तथ्य नाही, असे सांगत कोणत्याही प्राथमिक चौकशीत आपल्या कुटुंबापैकी कुणावरही आरोप सिद्ध झाला, तर राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचा हा खुलासा भाजपमधील त्यांच्याच कुणा गुप्त शत्रूला दिलेला इशाराच समजायला हवा. पक्षाचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले राजनाथ हे रा. स्व. संघाच्या अतिशय जवळचे आणि लाडके समजले जातात. त्यांच्या मुलाच्या नावाने असे वृत्त पसरवले जात असताना, त्यांच्या जाहीर खुलाशानंतर अवघ्या काही मिनिटांतच पंतप्रधानांच्या कार्यालयातूनही खुलासा होणे हे आश्चर्यकारक आहे. असे आरोप सामान्यत: विरोधकांकडून केले जातात. या प्रकरणी मात्र विरोधकांच्या हाती असले कोलीत देण्यात भाजपतील कुणी झारीतले शुक्राचार्य कारणीभूत व्हावेत, हे त्या पक्षाच्या दृष्टीने हानीकारक आहे. सत्तेतील क्रमांक दोन कोण या विषयावर चर्चा होऊच नये, असे जरी मोदी यांना वाटत असले, तरीही सत्तेची चव चाखत असलेल्या अनेकांना त्याच विषयात रस असणे स्वाभाविक आहे. असे काही घडलेच नाही, असा पंतप्रधान कार्यालयापाठोपाठ भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही खुलासा करून पक्षाची प्रतिमा सावरण्याचा केलेला प्रयत्न किती काळ उपयोगी पडेल, हे सांगणे कठीण आहे. सत्तेतील साटमारीतून अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या की त्यामध्ये खरेच तथ्य आहे, हे जाहीर होणे कठीण आहे. या घटनेवरून पक्षात सारे काही ठीकठाक आहे आणि मोदी यांच्या हुकमाचे अस्त्रच अंतिम आहे, या समजाला मात्र तडा गेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रत्येकावर बारीक नजर ठेवून त्यांना धाकात ठेवायचे की त्यांना कामाचे स्वातंत्र्य देऊन अपेक्षित काम करून घ्यायचे, याचा विचार आता खुद्द मोदी यांनाच करावा लागेल.