औद्योगिक काळातून भारताने तंत्रप्रधान अवस्थेत मजल मारली आहे, हे जणू एचएमटीला कधी समजलेच नाही. देशातील पहिली स्वयंचलित, क्वार्ट्झ घडय़ाळे घडविणारी ही कंपनी. नव्वदोत्तरी कालखंडात तिने जणू हायच खाल्ली. आपला ग्राहक असलेल्या मध्यमवर्गाच्या आशाआकांक्षाही बहरल्या आहेत, हेही या सरकारी कंपनीच्या ध्यानी आलेच नाही.
काळ  मोठा कठोर असतो. स्वार्थीही असतो. सर्वानी आपल्याशी सुसंगत असावे अशीच त्याची अपेक्षा असते आणि अपेक्षाभंग करणाऱ्यांना नामशेष होण्याची शिक्षा असते. त्यापासून कोणासही – अगदी तो ‘देशाचा समयप्रहरी’ असला तरी – सुटका नसते. म्हणूनच अ‍ॅपलचे आय-वॉच बाजारात यावे आणि त्याच सुमारास एचएमटीची घडय़ाळनिर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला जावा याला योगायोग म्हणता येणार नाही. तो काळाचा न्याय आहे. गतीचा कायदा न पाळल्याचा दंड आहे. एरवी एके काळी लाखो मनगटांवर सजून दिसणाऱ्या एचएमटी घडय़ाळांना अशी काटय़ांवर काटे ठेवून बसण्याची वेळ आलीच नसती. ती आली ही निश्चितच वेदनादायक गोष्ट आहे. पण हे दु:ख एक सरकारी कंपनी बंद पडली याचे खचितच नाही. सरकारी कंपनी बंद पडण्याचे दु:ख आपणांस होत असते तर या देशात केवढी मोठी क्रांती झाली असती. पण ते तसे नाही. कारण सरकारी कंपन्यांचे जीवनचक्र आपणांस चांगलेच माहीत असते. ते आपण मनोमनी स्वीकारलेही आहे. सरकारने प्रचंड भागभांडवल घालून एखादी कंपनी उभारावी. ती फुगवावी. मग ती दुभती गाय ही आपल्या पिताश्रींचीच मत्ता असे समजून सर्वानी तिचे जमेल तसे दोहन करावे. त्याने ती आजारी पडली की तिला पॅकेजांचे सलाइन द्यावे. रुग्णामध्ये तेवढय़ाने धुगधुगी राहते. ती वर्षांनुवष्रे टिकवावी. कारण सवाल आपल्या नोकरीचा असतो. लाखांचा पोिशदा मेला तरी चालेल पण लाखांचा पगार जगला पाहिजे, हे तर सरकारमान्य तत्त्वच. तेव्हा अशी कंपनी चालेल तेवढी चालते. एके दिवशी मरते. २०१२-१३ या एका वर्षांत ११ कोटी रुपयांचा महसूल मिळवून २४२ कोटी रुपयांचा फटका खाणाऱ्या ‘एचएमटी वॉचेस’चे असेच झाले. हा असा तोटा आणि उरलेसुरले एक हजार एकशे पाच कर्मचारी (त्यातही उच्चपदस्थ तब्बल १८१) यांच्या भाराने ही कंपनी रसातळाला गेली. कालवश झाली. पण ती सरकारी कंपनी होती याहून ती घडय़ाळांची पहिलीवहिली भारतीय कंपनी होती हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते. अशी कंपनी आता स्मरणखोलीच्या अडगळीत जाऊन पडणार हे आपल्यासाठी अधिक क्लेशदायी आहे.
तशी घडय़ाळ ही काही खास भारतीय गोष्ट नाही. कृषिप्रधान संस्कृतीला अशा काटेकोर कालमापनाची आवश्यकताच नसते. तेथे पळे आणि घटका या गोष्टी धार्मिक कर्मकांडासाठी, झालेच तर ज्योतिष वगरेंचा अभ्यास करणाऱ्यांसाठी असतात. पाश्चात्त्य संस्कृतीतही नेमकी घटिका समजून घेण्यात रस निर्माण झाला तो पाचव्या शतकात ख्रिस्ती धर्मातील बेनेडिक्टाईन ऑर्डरच्या पायाभरणीने. संत बेनेडिक्टने प्रार्थनांच्या वेळा ठरवून दिल्याने. ही वेळ निश्चित केली जाई ती ‘सूर्यघडय़ाळा’ने. पुढे चर्चमधून पाण्यावर चालणारी घडय़ाळे आली. यांत्रिक घडय़ाळांची नेमकी जन्मवेळ आज सांगता येत नाही, परंतु इकडे ज्ञानोबा माऊलींच्या ज्ञानेश्वरीने मऱ्हाटी मुलुखातील अध्यात्माचा पस रुंदावत होता त्या काळात ब्रिटनमधील कँटरबरी कॅथ्रेडलसारख्या काही प्रार्थनाघरांतून नुकताच यांत्रिक घडय़ाळांचा वापर सुरू झाला होता. पण ब्रिटन काय किंवा भारत काय, एरवीचा जीवनव्यवहार चाले तो ‘सूव्र्यादेवाच्या घडय़ाळा’बरहुकूमच. ‘सूर्य कासराभर वर आला’ म्हणजे किती वेळ झाला हे येथील अनागर कृषिसंस्कृतीला बरोबर समजत असते. मिनिट आणि सेकंद समजण्याची गरज निर्माण झाली ती औद्योगिक क्रांतीने. कारखान्यांची असेंब्ली लाइन एका तालासुरात चालवायची, तर मिनिटांचा हिशेब हवाच. एकोणिसाव्या शतकात भारतात ठिकठिकाणी कारखान्यांच्या चिमण्या उभ्या राहू लागल्या आणि हा हिशेबीपणा सुरू झाला. स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक प्रगतीबरोबर मनगटांवरची घडय़ाळे मानगुटीवर आली आणि आपल्या मुलाला घडय़ाळ समजते ही पालकांसाठी अभिमानाची गोष्ट बनली. यातही मौज अशी की एवढे सारे होऊनही कृषिसंस्कृतीतून उगवलेली आपली मानसिकता मात्र तशीच राहिली. जग भलेही वेळेच्या ग्रीनविच मानकावर चालत असेल, आपल्याकडे मात्र चालत असे तो इंडियन स्टॅण्डर्ड टाइमच. ‘आजीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक’ ही केशवकुमारांची कविता मध्यमवर्गास प्रिय असते त्याचे गमक हेच. अशा काळात पंडित नेहरूंच्या सरकारने घडय़ाळाचा कारखाना उभारावा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पायाभूत गरजा भागविणारे उद्योग सुरू करणे ही स्वातंत्र्योत्तर भारताची प्राथमिक निकड होती. तरीही त्यांना घडय़ाळनिर्मिती करावी असे वाटणे ही औद्योगिक समाजरचनेतील वेळेचे प्रभुत्व अधोरेखित करणारी बाब आहे. १९६१ मध्ये जपानच्या सिटिझन वॉच कंपनीच्या सहकार्याने बेंगळुरूमध्ये िहदुस्तान मशिन टूल्सने घडय़ाळनिर्मिती सुरू केली आणि पाहता पाहता ही घडय़ाळे ‘देशाची धडकन’ बनली. स्वयंचलित, तारीख-वार दाखविणारी, ब्रेल लिपीतली, क्वार्ट्झची अशा विविध प्रकारची घडय़ाळे एचएमटीने देशात सर्वप्रथम निर्माण केली. १९८० पर्यंत ही घडय़ाळे कोटय़वधी मनगटांवर जाऊन बसली. खरे तर असंख्य भारतीयांसाठी ते केवळ वेळ दाखविणारे यंत्र नव्हते. तो दागिना होता. याच सुमारास बाजारात आणखी काही घडय़ाळनिर्मिती कंपन्या उतरल्या आणि एचएमटीची चमक कमी होऊ लागली. त्या घडय़ाळांची दागिन्याची रया गेली. अंकीय तंत्रज्ञानाने तर या कंपनीचा पायाच भुसभुशीत करून टाकला. तशात कंपनीचे सरकारी खाक्याचे कासवछाप कामकाज. त्याने वेळेच्या स्पध्रेत ही कंपनी मागे पडली ती पडलीच.  
आज घडय़ाळांचे स्वरूप पालटले आहे. त्याचा वापर बदलला आहे. स्वाभाविकच आहे. पूर्वीची नऊ ते पाच कचेरी आणि मग रात्री साडेनवाचा नाटकांचा खेळ ही औद्योगिकयुगीन मध्यमवर्गीय रहाटी केव्हाच संपली आहे. आजच्या अंकीय तंत्रप्रधान काळात एकूणच मानवी आयुष्यातील वेळेची समीकरणे उलटीपालटी झाली आहेत. अशा परिस्थितीत घडय़ाळ हे केवळ वेळ दाखविणारे उपकरण राहूच शकत नाही. त्याने सचिवाची भूमिका घेतलेली आहे. अ‍ॅपलचे आय-वॉच हे त्यातीलच पुढचे पाऊल. एकीकडे संगणकीय सचिव म्हणून हातावरची घडय़ाळे काम करू लागली आहेत, तर त्याच काळात व्यक्तीच्या रुबाबात, प्रतिष्ठेत भर घालणारा महागडा दागिना म्हणूनही त्यांचे ब्रँिडग केले जात आहे. एरवी हरेकाच्या हाती असलेल्या मोबाइल फोनमध्ये वेळ दिसत असताना कोण घडय़ाळाचे ओझे वागवत बसले असते? एचएमटीची धाव अगदी या नव्या रूपापर्यंत जावी एवढी कोणाची अपेक्षाही नव्हती. पण ती कालसुसंगत तरी असावी ना? औद्योगिक काळातून भारताने तंत्रप्रधान अवस्थेत मजल मारली आहे, हे जणू एचएमटीला कधी समजलेच नाही. देशातील पहिली स्वयंचलित, क्वार्ट्झ घडय़ाळे घडविणारी ही कंपनी. नव्वदोत्तरी कालखंडात तिने जणू हायच खाल्ली. मध्यमवर्ग हा एचएमटीचा ग्राहक. पण त्याच्या आशाआकांक्षाही बहरल्या आहेत, हेही या कंपनीच्या ध्यानी कधी आलेच नाही.
अँबेसेडर कार, बजाजची स्कूटर ही एके काळची वैभवाची द्योतके. या प्रतिष्ठादायक गोष्टीही अशाच मागे पडल्या. एचएमटीही तशीच काळाच्या सुडास बळी पडली. त्याची हळहळ आहेच. पण त्यात स्मरणरंजनाचीच छटा अधिक आहे. व्यवहारात त्याला काहीच किंमत नसते. व्यवहारात जेव्हा काळ मागे लागलेला असतो, तेव्हा थांबून चालत नसते. तसे थांबणारे संपतात. हे तसे सर्वपरिचित कालसत्य. ते सांगण्यासाठीही घडय़ाळाच्या कंपनीचे उदाहरण कामी यावे ही मात्र खरोखरच दु:खाची गोष्ट.