तामिळमध्ये स्त्रीवादी, बंडखोर लेखिकांची मोठी परंपरा आहे. त्यात शिवासुंदरी, सी. एस. लक्ष्मी यांच्यापासून अलीकडच्या अंबई, व्होल्गा यांसारख्या लेखिकांचा समावेश होतो. राजम कृष्णन याच परंपरेतील एक खणखणीत नाव. फारसे शिक्षणही न झालेल्या राजम यांचे वयाच्या पंधराव्या वर्षीच लग्न झाले, सोळाव्या वर्षांपासून त्यांनी पतीच्या प्रोत्साहनामुळे लिहायला सुरुवात केली आणि तेविसाव्या वर्षी त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांच्या कथेला न्यूयॉर्कमधील हेरॉल्ड ट्रिब्यून इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला. रीतसर संशोधन करून- म्हणजे निवडलेल्या विषयाशी संबंधित लोकांच्या भेटीगाठी-मुलाखती घेऊन, पूर्ण माहिती जमवून आणि प्रत्यक्ष जगणाऱ्यांशी बोलून मगच त्या आपले कादंबरीलेखन सुरू करत. अशा प्रकारे फील्डवर्क करून लेखन करण्याची परंपरा त्यांनीच तामिळमध्ये सुरू केली. त्यांच्या ८० हून अधिक कादंबऱ्या आणि १०० हून अधिक कथा याच प्रकारे लिहिल्या गेल्या आहेत. निव्वळ काल्पनिक लेखनावर त्यांचा विश्वास नव्हता. राजम यांनी तंजावरला जाऊन तेथील सामान्य शेतकऱ्यांचे आयुष्य समजावून घेऊन त्यावर लेखन केले, गोवा स्वतंत्र झाला तेव्हा तिथे जाऊन गोवामुक्ती आंदोलनावर लेखन केले. मिठाच्या गोदीमध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांना भेटून त्यांच्याविषयी लिहिले. राजकारण आणि राजकीय चळवळी यांच्या इतिहासात बेदखलच राहिलेल्या  स्त्रियांविषयी लिहिले, तसेच दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी जमातींविषयीही लिहिले. कुठल्याही मानववंशशास्त्रज्ञाला हेवा वाटावा अशी कामगिरी राजम यांनी केली; पण त्यांनी कधी स्वत:ला संशोधक म्हणवून घेतले नाही.
 महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर त्यांचा नितांत विश्वास होता. स्त्री भ्रूणहत्येविषयी लिहिणाऱ्या त्या तामिळमधील पहिल्या लेखिका. आपल्या भ्रूणाची हत्या कराव्या लागलेल्या अनेक आयांना भेटून त्यांनी त्यामागची कारणपरंपरा जाणून घेतली. सामान्य शेतकरी, छोटे गुन्हेगार, मीठ कामगार, महिला कामगार, कैदी यांच्याविषयी राजम यांना अपार सहानुभूती होती. विशेषत: यातील महिलांच्या होणाऱ्या शोषण, अत्याचार आणि हिंसेविषयी त्या कळवळून जात. ‘महिलांना कुत्र्यांसारखं जीवन जगावं लागतं हे लज्जास्पद आहे,’ असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. त्या आयुष्यभर साधेपणाने राहिल्या आणि जगल्या. साहित्य अकादमी, सरस्वती सन्मान, सोव्हिएत लॅण्ड नेहरू पारितोषिक असे अनेक मानाचे पुरस्कार मिळालेल्या या लेखिकेने आपले पार्थिवही समाजाच्या उपयोगी पडावे यासाठी चेन्नईतील श्री रामचंद्र विद्यापीठाच्या रुग्णालयाला देण्याचा निर्णय मृत्यूपूर्वीच घेऊन ठेवला होता.