रिक्षाचालकाकडून अपहरण होण्याच्या भीतीने ठाण्यातील कोलशेत भागात राहणाऱ्या स्वप्नाली लाड या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा एकदा दोन तरुणींबाबत अशी घटना घडली. या प्रकारांनंतर ठाण्यातील रिक्षांमध्ये ‘स्मार्ट आयडी कार्ड’ बसवण्याची योजना प्रभावीपणे राबवण्याची मागणी जोर धरत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलिसांनी आणलेली ही योजना सक्तीची नसल्याने बहुसंख्य रिक्षाचालक यातून आपले अंग काढून घेत असल्याने आता ही योजना सक्तीने राबवण्यात यावी, असा मतप्रवाह आहे.  
रत्नागिरीहून एका कार्यक्रमासाठी ठाण्यात आलेल्या दोन तरुणी रिक्षातून भिवंडी येथे जात असताना रिक्षाचालकाने केलेल्या अश्लील हावभावामुळे घाबरून त्यांनी धावत्या रिक्षातून उडी घेतली. या रिक्षाचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच त्याने रिक्षात स्मार्ट आयडी कार्ड बसवले होते की, याचीही तपासणी सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर स्मार्ट आयडी कार्ड बसविण्याची गरज अधिक प्रकर्षांने जाणवू लागली आहे. स्वप्नाली लाड  घटनेनंतर ठाणे पोलिसांनी आणलेल्या या योजनेत आतापर्यंत १७ हजार रिक्षांवर स्मार्टकार्ड बसविण्यात आले आहे. उर्वरित पाच हजार रिक्षांवर स्मार्ट कार्ड बसविण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी, शहरातील अधिकृत आणि अनधिकृत रिक्षांचा आकडा यापेक्षाही जास्त आहे. तसेच वाहतूक पोलिसांची स्मार्ट कार्ड योजना सक्तीची नाही. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेली ही योजना आपल्याच अंगलट येण्याची भीती असल्याने अनेक रिक्षाचालकांनी अद्याप स्मार्ट कार्ड बसविलेले नाही.  

गेल्या दोन महिन्यांत सुमारे १६ हजार रिक्षांवर कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी केले आहे.  महिलांनी स्मार्ट आयडी असलेल्या रिक्षातूनच प्रवास करावा आणि स्मार्ट आयडी नसलेल्या रिक्षाचालकाला ते बसविण्याचा आग्रह धरावा. तसेच या स्मार्ट कार्डसाठी ‘सेफ जर्नी अप्लिकेशन डाऊनलोड’ करावे किंवा या आयडीचा फोटो काढून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.