शहरीकरणाच्या झपाटय़ात मॉल्स, हॉटेल्स, रिटेल स्टोअर्स यांची ‘चकाचक’ संस्कृतीही फोफावत चालली आहे. तेथील  खरेदी, खानपान सर्वसामान्यांना परवडणारे नसले तरी केवळ तो झगमगाट अनुभवण्यासाठी अशा ठिकाणी जाणाऱ्यांची कमी नाही. मात्र, नेत्रहीन व्यक्तींच्या नशिबी हे सुखदेखील येत नाही. ती न्यारी दुनिया त्यांना अनुभवता येत नाही. मात्र, ठाण्यातील एका मॉलने अंध व्यक्तींसाठी ‘ब्रेल’ लिपीतील मेन्यू कार्ड बनवून आणि दुकानांच्या नावांवर ‘ब्रेल’ लिपीतील ‘स्टीकर्स’ लावून अंधांसाठी या दुनियेचे दार किलकिले केले आहे.
‘झेव्हियर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड’ संस्थेचे संचालक डॉ. सॅम तारापोरवाला  अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील मेन्यू कार्ड उपलब्ध करून देण्यासंदर्भातील संशोधन केले. या संशोधनातून तयार झालेले ब्रेल मेन्यू कार्ड ठाण्यातील विवियाना मॉलमधील रेस्टॉरन्टमध्ये ‘वर्ल्ड ब्रेल डे’च्या निमित्ताने खुले करण्यात आले.
सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये सगळ्यांना समान हक्क उपलब्ध असले तरी शहरामध्ये वावरत असताना अंध व्यक्तींच्या व्यवहारावर काही मर्यादा येत असतात. या मर्यादांवर मात करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला असल्याची माहिती शेठ डेव्हलपर्स अ‍ॅण्ड रिअल्टर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन शेठ यांनी दिली.
याशिवाय, प्रत्येक दुकानाच्या बाहेर ब्रेल लिपीतील स्टिकर्स चिकटवण्यात आलेले आहेत. या स्टिकर्सवरून त्या दुकानाचे नाव आणि ते कशाचे दुकान आहे याची माहिती अंध ग्राहकांना मिळू शकणार आहे. तसेच त्यावरील चिन्हावर मॉलच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणारा पेन ठेवल्यानंतर त्याची माहिती त्या पेनच्या माध्यमातून ग्राहकाला ऐकताही येऊ शकते. मॉलमधील प्रत्येक माळ्यांवरील दुकानांचे ठिकाणी समजू शकतील अशा प्रकारच्या ध्वनिफितीतून मार्गदर्शन करणारा ‘ऑडिओ टेक्स्टाइल फ्लोअर प्लॅन’ सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
श्रीकांत सावंत, ठाणे