कळवा येथील वाघोबानगरमधून सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या १० वर्षीय मुलाचा पाटण्यात शोध लागला आहे.  शाळा सुटल्यानंतर तो परिसरातील एका तलावात पोहण्यासाठी जात असे. त्याच्या दोन मित्रांनी त्याला याबाबत वडिलांना माहिती देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे वडील ओरडतील, या भीतीपोटी तो घर सोडून पळून गेला होता.
ठाणे पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला.
कळवा येथील वाघाबोनगर परिसरात सियाराम गौतम  राहत असून त्यांचा १० वर्षीय मुलगा ग्यानेंद्र हा सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता.  या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झाली होती.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार, या युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, यांच्या पथकाने त्याला शोधून काढले. तो  पाटणा येथील एका आश्रममध्ये राहत होता. तेथून त्याला पोलीस पथकाने ठाण्यात आणून आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे.