ठाणे शहरातील पदपथ फेरीवालामुक्त व्हावेत यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एकीकडे युद्धपातळीवर पयत्न सुरू केले असताना पूर्व भागातील कोपरी परिसरात रस्ते अडवून बसणाऱ्या चिंधी बाजाराला संरक्षण मिळावे यासाठी सत्ताधारी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी जीवाचा आटापिटा चालविल्याचे चित्र दिसू लागले आहे. रेल्वे स्थानकाला खेटून असलेल्या या बाजारावर जयस्वाल यांच्या आदेशामुळे कारवाई सुरू होताच खवळलेल्या शिवसेना नेत्यांनी दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करत या मुद्दय़ावरून भावनिक राजकारण सुरू केल्याने इतके दिवस जोमाने सुरू असलेली कारवाई सध्या थंडावली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसरातील रस्ते अत्यंत अरुंद असल्याने या भागात सकाळ-सायंकाळी वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. त्यातच या भागातील पदपथांवर भरणारा चिंधी बाजार हा खोळंबा आणखी वाढवू लागला आहे. महापालिकेच्या कायदा, नियमांना धाब्यावर बसवून या भागातील पदपथ आणि रस्त्यांच्या कडेला अगदी बिनधोकपणे हा बाजार भरतो. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी हा बाजार सुरू झाल्याचे काही स्थानिक शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी या बाजारात स्थानिकांपेक्षा बाहेरच्यांचा राबता अधिक असल्याचे बोलले जाते. मुंबई, नवी मुंबई परिसरातून अनेक विक्रेते या बाजारात येतात.
पूर्व भागातील रहिवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सक्त आदेश देत या बाजारावर कारवाई सुरू केली. महापालिकेतील शिवसेनेच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही या कारवाईला पाठिंबा होता. मात्र, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी या कारवाईला जाहीर विरोध केला असून इतर ठिकाणचे फेरीवाले तुम्हाला दिसत नाहीत का, असा थेट सवाल करणारे पत्र त्यांनी पालकमंत्री एकनाथ िशदे यांना पाठविले आहे. आनंद दिघे यांच्या कार्याचा सत्तेपुढे विसर पडला की काय, असा सवालही या पत्रात करण्यात आला आहे. स्वर्गीय दिघे यांचे नाव पुढे करून पालकमंत्र्यांवर भावनिक दबाव वाढविण्याच्या लांडगे यांच्या प्रयत्नामुळे गेल्या काही दिवसांपासून हा चिंधी बाजार पुन्हा जोमाने सुरू झाल्याचे चित्र आहे.