शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून निवडून येतील आणि महापालिकेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना पळताभुई थोडय़ा करतील, अशी अपेक्षा आपल्या नगरसेविकांकडून बाळगणाऱ्या शिवसेना नेत्यांचा सध्या भ्रमनिरास होऊ लागला आहे. विरोधी बाकांवरील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना जशास तसे उत्तर देण्याऐवजी शिवसेनेच्या काही नगरसेविका सभागृहातील आपल्याच पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणू लागल्याने यांना आवरावे तरी कसे, या पेचात स्वतला ‘वाघ’ म्हणविणारे पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी सापडले आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदींना अंतिम मंजुरी नसताना ठरावीक नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांना हिरवा कंदील दाखविला जात असल्याची तक्रार करत पक्षाच्या काही नगरसेविका सभागृह डोक्यावर घेऊ लागल्याने हतबल झालेल्या पदाधिकाऱ्यांना भर सभागृहातच त्यांच्यावर ‘आवाज’ चढवावा लागल्याचे दृश्य नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दिसून आले.
ठाणे महापालिकेत सत्तेत असूनही शिवसेना नगरसेवकांची सभागृहातील अवस्था मात्र केविलवाणी झाल्याचे सातत्याने दिसून येते. अडीच वर्षांपूर्वी महापौरपदी निवड झालेले हरिश्चंद्र पाटील यांच्या एककल्ली कारभारामुळे शिवसेनेचे नगरसेवकच नाराज होते. त्यामुळे या वेळी तरी एखाद्या ‘कट्टर’ शिवसैनिकास संधी द्या, असा आग्रह पक्षाच्या इतर नगरसेवकांनी धरला होता. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ िशदे यांचे निकटवर्तीय आणि वागळे इस्टेट परिसरातील एकनिष्ठ शिवसैनिक संजय मोरे यांची महापौरपदी निवड करण्यात आली. मोरे यांच्या निवडीमुळे सभागृहात शिवसेनेचा वरचष्मा निर्माण होईल, अशी आशा सत्ताधारी पक्षातील नगरसेवक बाळगून होते. मात्र मागील तीन महिन्यांत सभागृहातील कामकाज पुरते विस्कळीत झाले असून महापौर म्हणून मोरे यांचा तसूभरही प्रभाव दिसत नसल्याने शिवसेनेत कमालीची अस्वस्थता आहे.
पालकमंत्री सांगतील ते कार्यक्रम करायचे आणि दौरे आखायचे यापलीकडे मोरे यांना फार काही जमत नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. शहरातील एका प्रतापी आमदाराच्या आग्रहास्तव मध्यंतरी सर्वसाधारण सभा सुरू असताना स्वतच्या खासगी दालनात बारमालकांची सभा घडवून आणल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला होता. असे असताना गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अनेक मुद्दय़ांवर आक्रमकता दाखवून शिवसेनेच्या नगरसेवकांचा घाम काढल्याचे चित्र ठसठशीतपणे दिसू लागले आहे.

विकासकामांवरून धारेवर
महिला पदाधिकारी आणि नगरसेविकांची फौज ही ठाण्यातील शिवसेनेची नेहमीच जमेची बाजू मानली जाते. विरोधी पक्षातील नगरसेवक आक्रमक होताच त्यांना तेवढय़ाच आक्रमकपणे उत्तर देण्यात या नगरसेविका आघाडीवर असायच्या. गेल्या काही महिन्यांपासून मात्र विकासकामांच्या मुद्दय़ावरून या नगरसेविका स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांनाच अडचणीत आणू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींना अद्याप अंतिम मंजुरी नसताना अपक्ष नगरसेविका आशा कांबळे यांच्या प्रभागातील शौचालयाचे काम कोणत्या तरतुदीतून करण्यात आले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला. महापौर निवडणुकीत पुरेसे संख्याबळ नसताना कांबळे यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. परतफेड म्हणून त्यांच्या प्रभागातील कामांच्या मंजुरीचा सपाटा सध्या लावण्यात आला आहे. असे असताना आपल्या प्रभागातील स्वच्छतागृहाची कामे प्रलंबित का आहेत, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका राधा फत्तेबहाद्दूर यांनी प्रशासनावर तोफ डागताना स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणल्याचे दृश्य नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. राधाभाभींच्या टीकेमुळे स्फुरण चढलेल्या काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेले करवाढीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्याची नामुष्की पत्करावी लागली. यामुळे संतापलेले स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के आणि गटनेते संतोष वडवले यांनी सभा संपताच भर सभागृहातच राधाभाभींवर ‘आवाज’ चढविल्याचे चित्र दिसून आले. म्हस्के आणि वडवले यांची अवस्था पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक मात्र भलतेच खुशीत होते.