tvlog01अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प उभारण्याचा निर्धार राज्य सरकारने केल्याने तेथील रहिवासी भलतेच खूश झाले. त्यामुळे कल्याण ते अंबरनाथ पट्टय़ात ‘चौथी मुंबई’ उभारली जाणार, अशी स्वप्ने साऱ्यांनाच पडू लागली आहे. पण ‘चौथी मुंबई’ शक्य आहे काय?  या दोन्ही शहरांमध्ये प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे. गेल्या आठवडय़ात पडलेल्या पावसामुळे तर येथे कित्येक तास वीज बेपत्ता होती. रेल्वेचा वाहतुकीचाही बोऱ्या वाजला.

क ल्याण ते अंबरनाथ पट्टय़ाला सध्या चौथी मुंबई हे गोंडस नाव मिळाले आहे. केंद्राच्या व राज्याच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात अंबरनाथ व बदलापूरला जागा मिळाल्याने इथले नागरिक खुशीत आहेत. राजकारणी, उद्योजक व विशेषत: बांधकाम व्यावसायिक आदींना तर अक्षरश: गुदगुल्या होत आहेत; परंतु चौथी मुंबई हे लोकांची भलामण करण्यासाठी दिलेले बिरुद असल्याचे आता सिद्ध होत आहे. याची प्रचीती येथील महावितरण वीज कंपनीच्या नुकत्याच झालेल्या केविलवाण्या अवस्थेवरून सिद्ध होत आहे. मोठा पाऊस झाल्यावर या भागातील वीज तब्बल तीस तास गायब झाली. त्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाले होते.
बदलापूर हे उगवते ‘स्मार्ट शहर’ असल्याने येथे माझे स्वत:चे लक्ष राहणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुळगांव-बदलापूर नगरपालिका निवडणूक प्रचारकाळात म्हणाले आणि सगळ्यांनीच त्याकडे आपले कान टवकारले. चौथ्या मुंबईचे हे सूतोवाच असल्याचे मानून काही जणांनी जल्लोषच करायचा बाकी ठेवला होता. मात्र, सध्या या शहराची परिस्थिती व विशेषत: येथे काम करणाऱ्या शासकीय संस्थांची परिस्थिती पाहता स्मार्ट शहराचे ध्येय हे केवळ स्वप्नच राहील की काय, अशी शंका निर्माण होत आहे. या भागात जून महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला. मात्र त्याला अतिवृष्टी म्हणता येणार नाही. तितक्या पावसात जर शहराची सारी व्यवस्था कोलमडून पडत असेल तर त्याला कोणत्या अर्थाने ‘स्मार्ट सिटी’ म्हणता येईल?
रेल्वे बंद तर मुंबई प्रवास बंद
२१ व्या शतकातही उपनगरी रेल्वे सेवा बंद पडली तर अंबरनाथ-बदलापूर परिसराचा मुंबईशी पूर्णपणे संपर्क तुटतो. जून महिन्यातील पावसाने त्याची पुन्हा प्रचीती आली. सलग दोन-तीन दिवस वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. रेल्वे सेवा बंद झाल्याने बदलापूरहून मुंबईला जायचे कसे, हा सवाल अनेकांना पडला होता, कारण येथे रेल्वे सेवा सोडल्यानंतर परिवहन सेवाच काय, पण खासगी वाहन सेवाही मुंबईकडे जाण्यास उपलब्ध नव्हती. येथे रेल्वेला समर्थ पर्याय असलेली परिवहन सेवा का नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.
महावितरणचा ‘महा’बोजवारा
मान्सूनचे जोरदार आगमन येथील महावितरण वीज कंपनीला मात्र चांगलेच बाधले असून वीज कंपनीच्या क्षमतेच्या मर्यादा यातून स्पष्ट झाल्या आहेत. दोन-तीन दिवस सलग वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला व यामुळे शहरातील महावितरण वीज कंपनीची व्यवस्था कोलमडली. अनेक झाडे विद्युततारांवर कोसळल्याने विद्युतप्रवाह खंडित झाला. ती नैसर्गिक आपत्ती असल्याने महावितरणला दोष देण्याचा हेतू नाही; परंतु आपत्ती आली की त्याला तोंड देण्यासाठी आपत्कालीन यंत्रणानामक गोष्ट अस्तित्वात असावी लागते, कारण विद्युत खांबांवर पडलेली झाडे हटविण्याचे काम हे कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचा अग्निशमन विभाग करत होता. महावितरणकडे त्यांच्या मालमत्तेवर आलेली आपत्ती निवारण करण्याची कोणतीच यंत्रणा नसल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. शहरात अजूनही अनेक विजेचे खांब वाकलेल्या व विद्युत तारा लोंबकळलेल्या अवस्थेतच आहेत. पाऊस पहिल्या दिवशी जोरात पडल्यावर संपूर्ण शहरात दिवसभर विजेचा लपंडाव चालू होता. या वेळी महावितरणच्या स्थानिक उप-अभियंत्यांकडून घेतलेल्या माहितीनुसार असे समजले की, तांत्रिक दोष सापडत नसून विजेच्या प्रत्येक खांबावर चढून अंदाज घेण्यात येत आहे.
हे सगळे खांब तपासण्याच्या नादात पाऊस पडतच होता आणि त्यामुळे दुसरे दोष उद्भवत वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. या सगळ्या प्रकारात येथील दोन अभियंते मेहनत घेत होते, पण नैसर्गिक आपत्तीच असल्याने त्यांना या प्रकाराला पुरे पडता आले नाही. अशी परिस्थिती उद्भवली असता महावितरणला त्यांच्या वरिष्ठांकडून कुशल मनुष्यबळ पुरविण्यात आले असते तर कदाचित हा प्रकार थांबू शकला असता, असे मत अनेक जण व्यक्त करताना दिसत होते.

आपत्ती म्हणजे काय रे भाऊ?
अमेरिकेत काही वर्षांपूर्वी दोन दिवस सलग वीज गेली होती. असा प्रकार त्यांच्याकडे प्रथमच घडल्याने त्यांनी त्यास ब्लॅकआऊट असे संबोधले होते. या काळात तेथे एका मनुष्याचा मृत्यू झाला होता, तर पाणी नसल्याने बाटलीबंद पाण्याच्या किमती वाढल्या होत्या. दोन दिवस वीज नाही ही परिस्थिती आणीबाणीची आहे, असे समजून त्यांनी तो दोष दूर केला होता. या प्रकरणात बदलापूरची अमेरिकेसारख्या प्रगत देशाशी तुलना करण्याचा हेतू नसून त्यांना वीज नाही ही परिस्थिती आपत्कालीन आणीबाणी वाटते या भावनेशी आहे. आपल्याकडे त्यांच्याइतकी यंत्रणा, पैसा नसला तरी दोन दिवस वीज नाही ही परिस्थिती आपत्ती आहे, असे का वाटू नये, असा प्रश्न सध्या हा त्रास भोगलेल्या नागरिकांकडून विचारला जातो आहे. असे जर वाटले असते तर किमान विजेच्या खांबांवर पडलेली झाडे हटविण्यासाठी महावितरणला पालिकेच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहावे लागले नसते. तसेच, वीज नसल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर पडला. पाणीपुरवठा खंडित झाला. अशा वेळी शहरात पाणी जाणार नाही या भीतीने किमान पंप सुरू करण्यासाठी जनरेटर किंवा तत्सम वीजपुरवठा करणारे यंत्र बसवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न का गेला नाही, असाही प्रश्न उद्विग्न मन:स्थितीतील नागरिक आता विचारत आहेत. याचा अर्थ, एका नगरात नैसर्गिक आपत्तीमुळे वीजपुरवठा खंडित होतो, तर पाणीपुरवठा थांबतो. कोणतीही शासकीय यंत्रणा या परिस्थितीचा सामना करू शकत नाही, ही खरे तर दुर्दैवाची बाब आहे. चौथी मुंबई म्हणून या शहराकडे पाहताना अजून किती पल्ला गाठायचा आहे, ही परिस्थिती उघड झाली असून याची जाणीव सध्या येथील प्रशासनाला व महत्त्वाचे म्हणजे लोकप्रतिनिधींना येणे आवश्यक आहे, कारण या प्रकारानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीने साधे पत्रही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या मुद्दय़ाबाबत लिहिले नसल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे. तसेच, नैसर्गिक आपत्ती या येतच राहणार, परंतु त्यांच्यावर मात करण्यासाठी शहर नियोजनात सहभागी असणाऱ्या प्रत्येक शासकीय संस्थेने नगरपालिकेव्यतिरिक्त स्वत:ची आपत्ती निवारण यंत्रणा निर्माण करणे ही आता काळाची गरज झालेली आहे.
भगवान मंडलिक