मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ठाण्यातील किसननगर भागात फुटल्याने शनिवारी झालेल्या दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या झोपडय़ांमध्ये शिरलेले पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पाण्याच्या प्रवाहाने जलवाहिनीला लागून असणाऱ्या झोपडय़ांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून त्यापैकी १० ते १२ घरे पाण्याच्या प्रवाहाने संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या कुटुंबांना ठाणे महानगरपालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात वर्तकनगर येथील दोस्तीच्या भाडेतत्त्वावरील योजनेतील घरांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच जलवाहिनी फुटीचे पाणी घरात शिरल्यानंतर अनेकांच्या घरातील अन्नधान्य वाहून गेल्याने ठाणे महानगरपालिकेकडून या लोकांसाठी जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसननगर भागातून जाणारी जलवाहिनी शनिवारी दुपारी अचानक फुटल्याने हा परिसर जलमय झाला होता. दरम्यान, रविवारी या परिसरातील पाणी ओसरल्याने सर्वत्र चिखल साचला होता. साफसफाईचे काम पूर्ण होईपर्यंत स्थानिक रहिवाशांना परिसरातील एका कंपनीत आणि सनराईज कम्पाऊंड येथे हलविण्यात आले.
पाण्याच्या प्रवाहाने १० ते १२ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती. त्या घरातील रहिवाशांचे वर्तकनगर येथील दोस्तीच्या भाडेतत्त्वावरील योजनेतील घरांमध्ये तात्पुरते स्थलातंर करण्यात आले आहे.
रोगराईविरोधात उपाय
ठाणे महानगरपालिकेकडून या भागातील साफसफाईचे काम सुरू होते. तसेच परिसरात रोगराई पसरू नये म्हणून औषध आणि पावडर फवारण्यात आली आहे, असे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, जलवाहिनी फुटीचे पाणी घरात शिरल्यानंतर अनेकांच्या घरातील अन्नधान्य वाहून गेल्याने ठाणे महानगरपालिकेकडून या लोकांसाठी जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली.

जलवाहिनी फुटून नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे काम २० तलाठी, तीन मंडळ अधिकारी आणि नायब तहसीलदार या अधिकाऱ्यांमार्फत सुरू होते. आतापर्यंत सुमारे ५६० घरांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तसेच या दुर्घटनेत सुमारे तीन कोटी १९ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार विकास पाटील यांनी दिली आहे.