पैसे झाडाला लागत नसतात, ही झाली सामान्यांच्या व्यवहारातील उक्ती. पण ठाणे शहरातील ठेकेदारांना यापुढे ‘झाड’ देऊन त्या मोबदल्यात बिलाचे पैसे घ्यावे लागणार आहेत. शहरात हिरवाई निर्माण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने एक अफलातून योजनाच हाती घेतली आहे. यानुसार प्रत्येक ठेकेदाराकडून त्याच्या बिलाच्या रकमेनुसार रोपे पालिका घेणार आहे. यातून पालिकेला फायदाच होणार आहे. प्रशासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या वृक्ष लागवडीच्या योजनेस हातभार लागणार आहेच, पण विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे पालिका कार्यालयात अनायासे येणार आहेत. या प्रस्तावास नुकत्याच झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली असून हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून महापालिकेने ठेकेदारांसाठी एक आदेशच काढला आहे. आधी वृक्ष द्या मगच कामाचे बिल मिळणार आहे. एक लाखाच्या बिलामागे ठेकेदारांना एका वृक्षाचे रोपटे महापालिकेस द्यावे लागेल. त्यानंतर रोपांची लागवड, संवर्धन महापालिकेमार्फत केले जाणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेने येत्या दोन वर्षांत पाच लाख वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प सोडला असून हा संकल्प पूर्ण करण्यासाठी यंदाच्या वर्षांत अडीच लाख तर पुढच्या वर्षांत अडीच लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षांतील अडीच लाख वृक्षांची लागवड करण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष विभागाने शहरातील वेगवेगळ्या भागांत सर्वेक्षण सुरू केले आहे. महापालिकेचे आरक्षित भूखंड, शाळा, उद्याने, तलाव या परिसरांत वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय वाहतुकीस अडथळा होणार नाहीत, अशा रस्त्यांवरही वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या लागवडीसाठी वृक्ष जमविण्याचे प्रयत्न महापालिका प्रशासनाने सुरू केले आहेत. याकरिता खासगी संस्था, बिल्डर यांच्याशी महापालिकेतर्फे संपर्क साधण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने आता ठेकेदारांकडून वृक्ष घेण्याचा नवा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला असून याकरिता ठेकेदाराने आधी वृक्षाचे रोप द्यावे, मगच त्यांना कामाचे बिल मिळेल, असा फतवा महापालिकेने काढला आहे. या फतव्यामुळे ठेकेदाराचे दोन लाखांचे बिल असेल तर दोन रोपे आणि दोन कोटींचे बिल असेल तर १०० रोपे द्यावी लागणार आहेत. विशेष म्हणजे, या निर्णयामुळे वृक्ष दिल्याशिवाय बिले मंजूर होणार नाहीत. त्यामुळे ठेकेदारांना आता बिले काढताना महापालिकेस रोपटी द्यावी लागणार आहेत. वृक्ष प्राधिकरण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यास धोरणात्मक मान्यता मिळाली असून हा प्रस्ताव आता सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मंजुरीसाठी ठेवला आहे.
वृक्ष लागवडीचे नियोजन
यंदाच्या वर्षांत नौपाडा, उथळसर व वर्तकनगर प्रभाग समित्यांच्या हद्दीत ३५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. वागळे, रायलादेवी व माजिवडा-मानपाडा प्रभाग समित्यांच्या हद्दीत ४५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कळवा, मुंब्रा व कोपरी प्रभाग समित्यांच्या हद्दीत २० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.