एखाद्या मतदारसंघात उमेदवाराचा प्रभाव नसला किंवा त्या भागातील नागरिकांचा त्याच्यावर रोष असेल तर अशा वेळी दुसऱ्या मतदारसंघात जाऊन वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यात सगळेच यशस्वी होतात असे नाही. या वेळच्या  विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांतील उमेदवारांनी मतदारसंघ बदलविले असून त्यात काँग्रेसच्या उमेदवारांचा समावेश जास्त आहे. त्यातील काही यशस्वी झाले, तर काही पराभूत झाले.
काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे गेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढले असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पराभूत केले होते. या वेळी त्यांनी पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि त्यात भाजपचे सुधाकरराव देशमुख यांच्याकडून पुन्हा पराभूत झाले आहेत. माजी महापौर असलेले ठाकरे यांचे आमदार होण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. काँग्रेसचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपुरातून निवडणूक लढविली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. या वेळी ते पुन्हा स्वगृही असलेल्या मध्य नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढले आणि पुन्हा ते पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यापूर्वी पूर्व नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढले असताना त्यांचा भाजपचे कृष्णा खोपडे यांनी पराभव केला होता. मात्र या वेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधिक्य बघता चतुर्वेदी यांनी ऐन वेळी दक्षिण नागपुरातून निवडणूक लढविल्यानंतर त्यांचा पराभव झाला.
भाजपचे युवा नेते आशीष देशमुख गेल्या निवडणुकीत सावनेर मतदारसंघातून काँग्रेसच्या सुनील केदार यांच्याविरोधात लढले असताना या वेळी त्यांनी काकांच्या विरोधात काटोल मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि त्यांना पराभूत केले. आशीष देशमुख हे काँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे चिरंजीव आहेत.
राज्यात मंत्री असलेले राजेंद्र मुळक गेल्या विधानसभा निवडणुकीत उमरेड मतदारसंघातून निवडणूक लढले होते. मात्र ते भाजपचे सुधीर पारवे यांच्याविरोधात पराभूत झाले होते. पराभूत झाल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक असल्यामुळे विधान परिषदेतून सरकारमध्ये गेले आणि मंत्री झाले होते. या वेळी त्यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी दिली, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा पराभव केला.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार गेल्या निवडणुकीत चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढले असताना विजयी झाले होते. या वेळी त्यांनी ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि पुन्हा मोदी लाटेमध्ये विजयी झाले आहेत. शिवसेनेचे संजय बंड पूर्वी तिवसा मतदारसंघातून निवडणूक लढले असताना ते पराभूत झाले होते. या वेळी त्यांनी बडनेरा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि पुन्हा अशस्वी ठरले. साहेबराव तट्टे पूर्वी मोशी विधानसभा मतदारसंघातून लढले असताना या वेळी तिवसामधून लढले आणि पराभूत झाले.