दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकणारे भाजप सरकार हवे, की दिल्लीश्वरांना गुडघे टेकायला लावणाऱ्या स्वाभिमानी शिवसेनेचे सरकार हवे, अशा निर्णायक लढाईसाठी आम्ही जनतेचा कौल घेत आहोत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवतील तो मुख्यमंत्री, अशी भाजपची भूमिका असून ‘मोदींचा पोपट’ मुख्यमंत्री म्हणून चालेल का, याचा आता जनतेनेच विचार करावा, अशा शब्दांत त्यांनी भाजपला चिमटे काढले. भाजपने हिंदुत्वाची कास सोडून या मुद्दय़ाची माती केल्याची कडवट टीकाही रावते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.
शिवसेना-भाजप युती तुटल्याच्या पाश्र्वभूमीवर विधानसभेसाठी अटीतटीची लढाई होत आहे. या पाश्र्वभूमीवर, युती तुटल्याची कारणे विशद करीत रावते यांनी भाजपवर चौफेर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसशी भाजपची छुपी युती असून काहीही झाले तरी युती तोडायचीच, असेच भाजपने ठरविले होते. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती टिकविण्यासाठी केलेले समझोत्याचे सारे प्रस्ताव भाजपने अमान्य केले, असे रावते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात ‘केम छे’ असे गुजरातीतून संभाषण झाल्याने पंतप्रधान हे गुजरातचे असल्याचेच निदर्शक आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान असून त्यांचा महाराष्ट्राशी काहीच संबंध नाही, असे मत रावते यांनी व्यक्त केले. मराठी-गुजराती असा कोणताही वाद शिवसेनेने केलेला नाही. असंख्य गुजराती बांधव महाराष्ट्रात पिढय़ान्पिढय़ा राहात आहेत व ते शिवसेनेबरोबर असल्याचे रावते यांनी नमूद केले. शिवसेनेकडे उद्धव ठाकरेंसारखे समर्थ नेतृत्व मुख्यमंत्रिपदासाठी असून भाजपकडे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारच नाही. त्यांच्या इच्छुक उमेदवारांची यादी वाढत असून त्यांच्यातील लाथाळ्याही वाढतच आहेत, अशी टीकाही रावते यांनी केली.
(सविस्तर मुलाखत उद्याच्या अंकात)