विदर्भात आलेल्या भाजपच्या लाटेने अकरापैकी पाच जिल्हे काँग्रेसमुक्त करून दाखवण्याची किमया साधली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असूनही फारशी प्रभावी कामगिरी न करणाऱ्या काँग्रेसच्या अनेक बडय़ा नेत्यांना या निकालाने कालबाह्य़ करून टाकले आहे. दोन तृतीयांश जागा भाजपच्या पदरात टाकणाऱ्या वैदर्भीय मतदारांनी शिवसेना व राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवून दिली आहे.
लोकसभेत युतीने पैकीच्या पैकी जागा जिंकल्या तेव्हाच विदर्भात प्रस्थापित विरोधी लाटेची तीव्रता जास्त आहे, याची जाणीव अनेकांना झाली होती. हा कौल भाजपच्या बाजूने झुकणारा आहे हेही तेव्हाच दिसून आले होते. युती असल्याने त्याचा फायदा तेव्हा सेनेला मिळाला. तरीही प्रत्येक निवडणूक वेगळी असते हा तर्क लावत सर्वच पक्ष विदर्भात रिंगणात होते. या साऱ्यांचा धुव्वा भाजपने उडवला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून राज्यात सत्तेत असलेल्या आघाडी सरकारला वैदर्भीय जनता कंटाळली होती. या सरकारने विदर्भाच्या प्रश्नांना कधीच प्राधान्यक्रम दिला नाही. शेतकरी आत्महत्या, अतिवृष्टी, नक्षलवाद, पायाभूत सुविधा यांसारख्या संवेदनशील मुद्दय़ांवर केवळ घोषणा करायच्या, पण त्या अमलात आणायच्या नाहीत, हेच धोरण आघाडी सरकारने राबवले. विदर्भात ओबीसींची संख्या लक्षणीय आहे. या वर्गाला देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आघाडी सरकारने बंद करून टाकल्या. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद झाली. यामुळे सामान्य जनता काँग्रेस व राष्ट्रवादीवर कमालीची नाराज होती. हे दोन्ही पक्ष विदर्भाला झुकते माप देत नाहीत, हे अनेक प्रकरणांत दिसून येत होते. आघाडी सरकारमध्ये असलेले विदर्भातील मंत्रीसुद्धा या भागातील समस्यांवर बोलत नाहीत, भांडत नाहीत, हेही अनेकदा दिसून येत होते. हा सर्व खेळ उघडय़ा डोळ्याने बघणाऱ्या जनतेच्या मनात लोकसभेच्या वेळीच भाजपविषयी आशा निर्माण झाली होती. नेमके तेच सूत्र पकडत भाजपने प्रचार केला व यश मिळवले.
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर भाजपने ऐन निवडणुकीत बरीच कसरत केली, पण या वेळी बदल हवाच अशा मानसिकतेत असलेल्या मतदारांनी या कसरतीकडे साफ दुर्लक्ष करत भाजपच्या बाजूने कौल दिला. ही लाट एवढी जबरदस्त होती की, वणी व रामटेकला भाजपने उभे केलेले परप्रांतीय कंत्राटदारसुद्धा भरघोस मतांनी निवडून आले.
काँग्रेसमध्ये अडगळीत पडलेल्या सुनील देशमुखांना जनतेने निवडून दिले, तर ऐनवेळी भाजपमध्ये जाणाऱ्या निष्क्रिय संजय देवतळेंना घरी बसवले. यावरून मतदारांना काय करावे, हे बरोबर कळते हेच सिद्ध झाले. राज्यातील आघाडी सरकारने वैदर्भीयांच्या वाटय़ाला कायम दुय्यम मंत्रिपदे दिली. युती सरकारच्या काळात विदर्भातील मंत्र्यांकडे वजनदार खाती होती. भाजपचा हा प्रचारसुद्धा फायद्याचा ठरला. सोबतच राज्यात सत्ता आली तर विदर्भाचा मुख्यमंत्री होईल, ही आशासुद्धा मतदारांना भाजपच्या बाजूने घेऊन गेली. त्या तुलनेत काँग्रेसच्या वर्तुळात सारा आनंदीआनंदच होता. विधानसभेत निवडून न येणारे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, चालताना आधार लागणारे शिवाजीराव मोघे, फटकळ बोलून लोकांना दुखावणारे नितीन राऊत, कपडय़ावर डाग पडू नये म्हणून दक्ष असणारे अनिल देशमुख, कायम मास्तरकीच्या थाटात वावरणारे वसंत पुरके, असे नेते असल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीची पुरती वाट लावणार, हे स्पष्टच दिसत होते आणि झालेही तसेच. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता, ही गोष्ट भाजपने कालबाह्य़ करून दाखवली.
लोकसभेतील दारुण पराभव ताजा असतानासुद्धा काँग्रेसने तेच जुने चेहरे मतदारसंघ बदलून रिंगणात उतरवले. वकूब गमावलेली ही नेते मंडळी जनतेचा विश्वास संपादन करू शकली नाहीत. राष्ट्रीय पातळीवर लयास गेलेला सोनिया व राहुलचा करिश्मा या नेत्यांना वाचवू शकला नाही. प्रदेशाध्यक्ष ठाकरेंचा यवतमाळ जिल्हा म्हणूनच काँग्रेसमुक्त झाला. भंडारा, गडचिरोली, अकोला, नागपूर शहर या जिल्ह्य़ांतून काँग्रेस साफ झाली. मुंबईत बसून राजकारण करणाऱ्या शिवसेनेलासुद्धा या वेळी मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. मुंबईच्या संपर्क प्रमुखांनी विदर्भात येऊन सल्ले देण्याच्या प्रकाराला मतदारांनी दाद दिली नाही. राष्ट्रवादीची ताकदच विदर्भात नगण्य होती. केवळ आयात केलेल्या उमेदवारांच्या बळावर यशाची आशा बाळगणाऱ्या व केवळ पश्चिम महाराष्ट्राराचे हित बघणाऱ्या राष्ट्रवादीला मतदारांनी साफ नाकारले. पुसदहून नाईक निवडून आले ते त्यांच्या पुण्याईवर. बाकी साऱ्या माजी मंत्र्यांना या भाजप लाटेने अक्षरश: झोपवले. विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेस तिसऱ्या स्थानावर फेकली गेली, एवढी या लाटेची तीव्रता अधिक होती. या दारुण पराभवातून काँग्रेस शहाणपण घेईल का आणि भाजप विजयाचा उन्माद विसरून जनतेच्या प्रश्नाकडे प्राधान्याने बघेल का, यावरच या लाटेचे भवितव्य अवलंबून आहे.
संसदीय मंडळातील चर्चेनंतरच राष्ट्रवादीबाबत विचार  – देवेंद्र फडणवीस 
काँग्रेस व राष्ट्रवादी आमचे विरोधक आहेत; पण शिवसेनेला आम्ही विरोधक समजत नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी  नागपूर  येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी यावर पक्षाच्या संसदीय मंडळात विचार केल्यानंतरच भूमिका ठरवली जाईल, असे ते म्हणाले.
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेच्या बाबतीत अतिशय सावध भूमिका घेतली. प्रचाराच्या काळात शिवसेनेवर टीका करणार नाही, असे आम्ही ठरवले होते. ते पथ्य पाळले. तेव्हा आणि आतासुद्धा शिवसेनेला आम्ही विरोधक समजत नाही. त्यामुळे सत्ता स्थापण्यासाठी युतीच्या मुद्दय़ावर विचार होऊ शकतो, असे ते म्हणाले. या वेळी राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, कारण सर्वात जास्त संख्याबळ भाजपकडे आहे, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.