आंबेडकरी चळवळीला दोन वैचारिक पदर आहेत. बौद्ध धम्माच्या नावाने चालणारी सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ आणि रिपब्लिकन नावाने चालणारी राजकीय चळवळ. आंबेडकरी चळवळीच्या समर्थकांमध्ये इथेच मोठी गुंतागुंत झाली आहे. विचारव्यवहारात आणि वर्तनव्यवहारातही मोठी तफावत जाणवते. या पाश्र्वभूमीवर नव्या बदलासाठी बाबासाहेबांच्या अनुयायांनी सज्ज झाले पाहिजे, हे सुचवणारा लेख, उद्या साजऱ्या होणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने..
आंबेडकरी चळवळ संपली आहे का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी सात-आठ वर्षांपूर्वी उपस्थित केला होता. त्यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सर्व प्रकारच्या विषमतेतून आणि सर्व प्रकारच्या शोषणव्यवस्थेतून संवैधानिक मार्गाने भारतीय समाजाची मुक्तता करण्यासाठी उभा ठाकलेला विचार म्हणजे आंबेडकरी विचार आणि त्यावर चालणारी चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ, अशी थोडक्यात आंबेडकरवादाची व्याख्या करता येईल. मग भारतातील सर्व समाज सामाजिक, आर्थिक, राजकीय शोषणातून मुक्त झाला आहे का, तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय शोषणव्यवस्था नष्ट झाल्या आहेत का, एक समाज, एक राष्ट्र म्हणून भारत देश उभा राहिला आहे का, तर नाही. असे असताना आंबेडकरी चळवळ संपली आहे का, ती थंड पडली आहे का, तिला मरगळ आली आहे का, तिचेच कुणी तरी शोषण करते आहे का, असे असंख्य प्रश्न पुढे का येत आहेत?
कोणत्याही विचाराला वा चळवळीला जसे समर्थक असतात तसेच विरोधकही असतात. त्यांचेही दोन भाग असतात. डोळस समर्थक व आंधळे समर्थक आणि उघड विरोधक व छुपे विरोधक. आंधळ्या समर्थकांकडून व छुप्या विरोधकांकडून चळवळीला खरा धोका असतो. आंबेडकरी चळवळही त्याला अजिबात अपवाद नाही. या पाश्र्वभूमीवर आंबेडकरी चळवळीची अशी छिन्नविच्छिन अवस्था का झाली आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. त्याला समर्थक किती जबाबदार आहेत व विरोधक किती कारणीभूत आहेत, याचाही विचार करावा लागेल. त्याचबरोबर सामाजिक-राजकीय व्यवस्थेचा अडसर आहे का, त्यावरही विचारविनिमय होणे आवश्यक आहे.
आंबेडकरी चळवळीला दोन वैचारिक पदर आहेत. ते एकमेकांपासून अलग करता येत नाहीत. हे दोन पदर कोणते, तर बौद्ध धम्माच्या नावाने चालणारी सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ आणि रिपब्लिकन नावाने चालणारी राजकीय चळवळ होय. आंबेडकरी चळवळीच्या समर्थकांमध्ये इथेच मोठी गुंतागुंत झाली आहे. विचारव्यवहारात आणि वर्तनव्यवहारातही मोठी तफावत जाणवते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी बौद्ध धम्माचा विचार दिला. तर समर्थकांनी त्यालाच जातीच्या भिंतीत कैद करून ठेवला. आंबेडकरांनी जातीयता, अंधश्रद्धा, कर्मकांड  यांनी ओतप्रोत भरलेली धर्म संकल्पना नाकारली आणि बुद्धिवादी, विवेकवादी, तर्कवादी, विज्ञानवादी आणि समतावादी बुद्ध विचार पुढे ठेवला. तर समर्थकांनी धम्माचेच धार्मिकीकरण करून टाकले. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या जंजाळात धम्माला बंदिस्त करून टाकले. धम्म हा धर्मातीत असला पाहिजे, तर त्यालाच एका पंथाचे स्वरूप आणून दिले. बौद्धाच्या नावाने हिंदू धर्माचेच अनुकरण केले जाऊ लागले. त्याची काही थोडक्यात उदाहरणे सांगता येतील-
हिंदू- देव्हाऱ्यात, देवळात देवपूजा
बौद्ध- घरात, विहारात बुद्धमूर्तीची पूजा
हिंदू- आचार्य
बौद्ध- बौद्धाचार्य
हिंदू- गुलाल
बौद्ध- नीळ
हिंदू- मंगलाष्टके
बौद्ध- अष्टमंगलगाथा
हिंदू- नामकरण विवाह, मृत्यूप्रसंगी विधींसाठी पुरोहित
बौद्ध- नामकरण, विवाह, मृत्यूप्रसंगी विधींसाठी भिख्खू
हिंदू- भटजींना दक्षिणा
बौद्ध- भिख्खूंना धम्मदान
 वास्तविक पाहता, आंबेडकरी चळवळीच्या धुरीणांबरोबरच समाजाचे प्रबोधन करणे ही बौद्ध भिख्खूंची जबाबदारी आहे. मात्र खेडय़ापाडय़ात भिख्खू कुठेही दिसत नाहीत. मग आंबेडकर जयंतीबरोबर म्हसोबा, खंडोबा, यल्लमाच्या जत्राही पार पाडल्या जात असतील तर त्याला जबाबदार कोण? बौद्ध म्हणून फक्त एका जातीचे नामांतर झाले. वर्तनव्यवहार तोच राहिला. मग तुम्ही वेगळे कसे? इतरांनी तुमचा काय आदर्श घ्यायचा? पुन्हा अनुयायांनी बौद्ध धम्म अपरिवर्तनीय करून टाकला. कालानुरूप त्यात काही बदल करण्याविषयी कुणी ब्र काढला तरी त्याला आंबेडकरद्रोही ठरविले जाते. अशी अपरिवर्तनीय किंवा सनातनी मानसिकता घेऊन सामाजिक परिवर्तनाची लढाई कशी लढणार?
अशीच गत रिपब्लिकन राजकारणाची आहे. पुन्हा धम्म आणि राजकारण यांची सरमिसळ केली जाते. त्यामुळे धम्मही वाढत नाही आणि राजकारणही उभारी घेत नाही. पुन्हा धम्म व राजकारण असा अंतर्गत कलह वेगळाच आहे. धम्म बाजूला ठेवून राजकारण करता येत नाही का? रिपब्लिकन राजकारणाच्या पराभवाला केवळ हा अंतर्गत वैचारिक संघर्षच कारणीभूत आहे का? एका जातीच्या बाहेर रिपब्लिकन पक्ष जात नसेल आणि विरोधकही त्याकडे जातीचा पक्ष म्हणूनच बघत असतील तर, आंबेडकरी राजकारणाचा पराभव कसा रोखणार? हे दोन प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि आंबेडकरी विचारांच्या अस्तित्वाचे आहेत. अर्थात त्याची उत्तरेही आपणास आंबेडकरी विचारातच शोधावी लागतील. त्यासाठी काही धाडसी कृती करण्याची आवश्यकता आहे. त्याची तयारी आहे का, हा प्रश्न पुढे येणार आहे.
रिपब्लिकन राजकारणाचा समर्थकांकडूनच कसा पराभव केला जातो, ते आधी पाहू या. बाबासाहेब आंबेडकरांना देशातील एक सर्वसमावेशक असा भक्कमविरोधी पक्ष उभा करायचा होता, त्याची संकल्पना त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या नावाने मांडली. परंतु त्यांच्या पश्चात ज्यांनी ज्यांनी आंबेडकरांचे नाव घेऊन रिपब्लिकन पक्ष चालविला किंवा इतर नावाचे पक्ष वा गट चालविले त्यांना हा पक्षही जातीच्या बाहेर काढता आला नाही. जात नाकारणारेही जातीच्या चक्रव्यूहात अडकत गेले. रामदास आठवले यांनी आपल्या रिपब्लिकन पक्षात आता ब्राह्मण, मराठा, धनगर, मातंग, अशा जातीच्या आघाडय़ा स्थापन केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी आधी घोषित केलेल्या व नंतर माघारी बोलावलेल्या त्यांच्या उमेदवाराचा ते जाहीरपणे हा मराठा समाजाचा उमेदवार आहे, असे सातत्याने सांगत होते. म्हणजे आम्ही आता व्यापक होत चाललो आहोत, असे त्यांना सांगायचे आहे, असा त्याचा अर्थ होतो. मायावती यांच्या बसपच्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये एक रकाना जातीचा असतो. मतदारसंघाबरोबर उमेदवाराच्या जातीचाही उल्लेख असतो. म्हणजे आम्ही ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित यांना किती प्रतिनिधित्व दिले याची जंत्री असते. मग जातीविरहित समाजरचनेचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे हे पक्ष आहेत, असे का म्हणावे आणि ते का मान्य करावे? सत्तेच्या राजकारणासाठी त्यांना जातीचाच आधार घ्यावा लागत असेल तर हा आंबेडकरी राजकारणाचा पराभव नव्हे काय?
आता या जातिव्यवस्थेतून रिपब्लिकन पक्षाला बाहेर काढले तरी त्याचा सध्याचा राजकीय व्यवस्थेत टिकाव लागणार आहे का? अठरापगड जातींना एकत्र करून निवडणुका जिंकणे म्हणजे तो आंबेडकरी विचारांचा विजय नव्हे आणि दुसऱ्याच्या वळचणीला जाऊन खासदारकी-आमदारकी मिळविणे म्हणजेही आंबेडकरी राजकारणाचा विजय नव्हे. त्यासाठी निवडणूक पद्धतीसह राजकीय व्यवस्था बदलावी लागणार आहे. कारण या पद्धतीतच आंबेडकरी राजकारणाचा पराभव आहे. थोडक्यात, काही अलीकडची उदाहरणे सांगता येतील. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसपला १७ लाख मते मिळाली. भारिप-बहुजन संघाच्या खात्यावर १० लाख मते जमा झाली. परंतु या दोन्ही पक्षांचा एकही उमेदवार लोकसभेत निवडून गेला नाही. परंतु तीन-चार लाख मते घेऊन स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी किंवा बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव लोकसभेत जातात, लोकप्रतिनिधी निवडण्याची ही निवडणूक पद्धत सदोष आहे की निर्दोष याचा विचार व्हायला पाहिजे. हा प्रश्न केवळ रिपब्लिकन पक्षाचा नाही, तर काही भूमिका घेऊन राजकारण करू पाहणाऱ्या इतर छोटय़ा-मोठय़ा पक्षांचाही आहे. सुंदर फुलबाग फुलवायची आहे. परंतु जमीन खडकाळ आहे, काय करायचे? फुलबागेसाठी जमीन सुपीक करावी लागेल म्हणजे त्यात सुधारणा करावी लागेल किंवा तसे होत नसेल तर जागा बदलावी लागेल. पक्षाच्या नावाने मिळणाऱ्या मतांच्या संख्येवर विधिमंडळातील किंवा संसदेतील त्यांचे प्रतिनिधित्व का ठरविले जाऊ नये? त्यावर व्यापक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.
आंबेडकरी विचारधारेचे एक सूत्र आहे. बाबासाहेब हे आधी बदलांच्या बाजूने असायचे, बदल होत नसेल तर ती व्यवस्था नाकारून नवी व्यवस्था निर्माण करणे हे त्यांच्या विचारातील एक सूत्र आहे. चातुर्वण्र्य व्यवस्थेवर आधारित ग्रामरचना आहे, त्यात अस्पृश्यांचे शोषण होते, म्हणून त्यांनी आपल्या समाजाला ‘खेडय़ाकडून शहराकडे चला’ हा संदेश दिला. खेडी सहजासहजी आणि लवकर बदलणार नाहीत, याची त्यांना खात्री होती, म्हणून त्या ग्रामव्यवस्थेलाच त्यांनी नाकारले. हिंदूू धर्मातील उच्च-नीचता संपवा म्हणून त्यांनी अविरत संघर्ष केला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून त्यांनी तो धर्मच नाकारला आणि बौद्ध धम्माच्या नावाने नव्या जीवनपद्धतीचा विचार स्वीकारला. आंबेडकरी चळवळ संपली आहे काय, असा हताशपणे विचार करीत बसण्यापेक्षा नव्या बदलासाठी आंबेडकरी अनुयायांनी सज्ज झाले पाहिजे. त्याची सुरुवात राजकीय आरक्षणाच्या विरोधातून व्हावी. राखीव मतदारसंघ नकोत, अशी भूमिका खुद्द बाबासाहेबांनीच नंतर घेतली होती आणि तसा ठरावही शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीने केला होता. त्यानुसार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बदलाचे हे धाडसी पाऊल टाकण्याची हिंमत आंबेडकरी नेतृत्व व अनुयायी दाखविणार का, हा खरा प्रश्न आहे.

prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
Ambedkari movement in the Bhil community Tribal woman and Dr Babasaheb Ambedkar
आदिवासी स्त्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: ताठरही नाही की तडजोडवादी नाही.. वंचित बहुजन आघाडी तर संधीवादी!