रेल्वेस्थानक तसेच गाडय़ांमध्ये ठरावीक कंपनीच्या बाटलीबंद पाण्यालाच परवानगी असताना लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये बनावट आणि कमी शुद्धतेच्या पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री असल्याचे आढळून आले आहे. फलाटांवरील स्टॉल्सवरही अशा पाण्याच्या बाटल्या विक्रीस ठेवण्यात येत असून ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम’ने (आयआरसीटीसी) या संदर्भात घेतलेल्या निर्णयाला हरताळ फासण्यात आला आहे.
कर्जत आणि कसारा स्थानकाबरोबरच पुढील लोणावळा, पुणे, भुसावळ या मार्गावरून पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेतील फेरीवाले सीलबंद पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी आणत असतात. या पाणी बाटल्या विक्रीसाठी रेल्वे प्रशासनाची मंजुरी नसल्याचे स्पष्ट होत असून कमी दर्जाच्या आणि असुरक्षित पाण्याची विक्री केली जात असल्याचे प्रकार घडत आहे.
स्थानिक पातळीवर तयार केलेल्या या बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न असून त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यालाही अपाय संभवतो. रेल्वेकडून विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याची पुरेशी माहिती प्रवाशांना नसल्याने याचा फायदा ठेकेदार आणि पाणीमाफिया उठवत आहेत.
‘आयआरसीटीसी’ने रेल्वेस्थानक आणि गाडय़ांमध्ये नऊ ठरावीक बॅ्रण्डच्या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीस परवानगी दिली आहे. त्यामध्ये बंपरअ‍ॅक्वा, अ‍ॅक्वाफिना, ऑक्सिरिच, किनले, बिस्लरी, ऑक्सीमोर, अ‍ॅक्वा गार्नीयोग, गॅलन, क्वेन्च या ब्रॅण्डचा समावेश असून रेल्वे निर्माण करत असलेल्या ‘रेल्वे नीर’चीही विक्री करण्यात येते. मात्र, या ब्रॅण्डऐवजी स्थानिक कंपन्यांकडून तयार केल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याचीच विक्री तेजीने सुरू असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे ग्राहकांनी ठरावीक ब्रॅण्डची आणि ठरलेल्या किमतीच्या पाणी विकत घ्यावे, असे आवाहन रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले आहे.