वर्ष १९९२ : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येच आयोजित विश्वचषक. मात्र जेतेपदापेक्षाही ते छायाचित्रच मनात ठसलेले. पाऊस थांबल्यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर एका चेंडूत २२ धावांचे आव्हान दर्शवणारा धावफलक. या अनाकलनीय गणितामागे होती  ‘रेन रूल’ प्रणाली.
वर्ष २००३ : ऑस्ट्रेलियाच्या जेतेपदापेक्षाही शॉन पोलॉकचे पाणावलेल्या डोळ्यांचे छायाचित्र त्या विश्वचषकाची ओळख झाले. दक्षिण आफ्रिकेला जेतेपदापासून हिरावण्यात डकवर्थ-लुइस जोडगोळी जबाबदार.
कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात पाऊस दाखल झाला की कर्णधारांच्या डोक्यात आणि उरात धडकी भरवणारी ही प्रणाली. निस्सीम क्रिकेट चाहते आणि गणिताची आवड असणाऱ्यांना आकलन होऊ न शकणाऱ्या डकवर्थ-लुइस जोडगोळीत आता तिसऱ्याची भर पडली आहे. डकवर्थ-लुइस पद्धतीत सुलभीकरण करण्यात स्टीव्ह स्टर्न यांचे योगदान लक्षात घेऊन यंदाच्या विश्वचषकात ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ या सुधारित नावाने ही प्रणाली अंगीकारण्यात आली आहे.
किचकट स्वरूपामुळे डकवर्थ-लुइस प्रणालीवर सातत्याने टीका होत होती. भारतात केरळमधील अभियंता व्ही. जयदेवन यांनी डकवर्थ-लुइसला पर्याय ठरेल, अशी ‘व्हीजेडी’ प्रणाली मांडली. या प्रणालीला मान्यता मिळावी, यासाठी जयदेवन यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र विविध प्रशासकीय पातळ्यांवरील अनास्थेचा जयदेवन यांना फटका बसला. स्टर्न यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांच्या समीकरणांचा प्रणालीत समावेश करण्यात आल्याने ‘व्हीजेडी प्रणाली’ अस्तित्वात येण्याआधीच कायमची गुंडाळली जाणार आहे.
मूळच्या अमेरिकेच्या असलेल्या स्टर्न यांना ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर क्रिकेटची गोडी लागली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये उडणारा गोंधळ लक्षात घेऊन त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. आयसीसीची मान्यता हे त्यांच्या अनेक वर्षांच्या संशोधनाचे फलित आहे. यंदाचा विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येच होत असल्याने स्टर्न यांना आपल्या प्रणालीचा प्रयोग ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवता येणार आहे.

*  पावसाने बाधित सामन्यांसाठी डकवर्थ-लुईस प्रणाली अंगीकारली जाते.
*  गणितीय आकडेमोडीद्वारे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघासमोर सुधारित लक्ष्य ठेवण्यात येते.
*  फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुइस या इंग्लंडच्या सांख्यिकीतज्ज्ञांनी तयार केलेली प्रणाली
*  स्टर्न यांच्या संशोधनानुसार अल्गोरिदमच्या माध्यमातून सोप्या आकडेमोडीद्वारे सुधारित लक्ष्य
*  स्टर्न क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठात सांख्यिकी प्राध्यापक व संगणक प्रणाली तज्ज्ञ