कारकीर्दीचा शेवट विश्वचषक उंचावून व्हावा, यासारखे भाग्य नसावे, जे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कच्या नशिबी होते. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकवून देणारा तो चौथा कर्णधार ठरला.
अंतिम सामन्यापूर्वीच क्लार्कने निवृत्तीची घोषणा केली होती आणि कर्णधाराला साजेशा ७४ धावांच्या आपल्या नेत्रदीपक खेळीच्या जोरावर त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
‘‘चार वर्षांपूर्वी मला कर्णधारपद देण्यात आले होते, त्यामुळेच मी या विश्वचषकासाठी संघबांधणी करू शकलो. त्यामुळेच आगामी कर्णधारालाही माझ्यासारखाच संघबांधणीसाठी अवधी मिळावा यासाठी निवृत्ती पत्करण्याची ही योग्य वेळ आहे,’’ असे क्लार्क म्हणाला.