हशिम अमला आणि फॅफ डय़ू प्लेसिस यांच्यासह डेव्हिड मिलर, रिली रोसोऊ या फलंदाजांनी धावांचे इमले रचले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सलग दुसऱ्या लढतीत चारशे धावांचा डोंगर उभा केला. धक्कादायक निकालांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आर्यलडची लढत मग या बुरुजाएवढय़ा लक्ष्यापुढे खुजी वाटू लागली. मग आर्यलडने या पाठलागाचे व्यर्थ प्रयत्न केले. अपेक्षेप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत २०१ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली.
अमलाने आर्यलडच्या दुबळ्या गोलंदाजीच्या माऱ्यावर चौफेर हमला केला. १२८ चेंडूंत १५९ धावांची लाजवाब खेळी साकारताना १६ चौकार आणि चार चौकार पेश केले. तर डय़ू प्लेसिसने १०९ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह १०९ धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २४७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेला ५० षटकांत ४ बाद ४११ धावा उभारता आल्या. भारताने २००७मध्ये बम्र्युडाविरुद्ध ५ बाद ४१३ धावा उभारल्या होत्या. हा विक्रम मात्र अबाधित राहिला.
अमला आणि प्लेसिस यांनी आफ्रिकेच्या डावाची पायाभरणी केल्यानंतर मिलर आणि रोसोऊ यांनी वेगवान फटक्यांनी सामन्याची लज्जत वाढवली. अखेरच्या २० षटकांत दक्षिण आफ्रिकेने २३० धावा केल्या. रोसोऊने फक्त ३० चेंडूंत ६ षटकार आणि ३ चौकारांसह नाबाद ६१ धावा काढल्या, तर मिलरने ४ चौकार आणि २ षटकारांनिशी २३ चेंडूंत ४६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम वेगवान माऱ्यापुढे फक्त अँडी बॅलबिर्नी (५८) आणि केव्हिन ओ’ब्रायन (४८) यांनी टिकाव धरला. आर्यलडचा डाव ४५ षटकांत २१० धावांत आटोपला. कायले अ‍ॅबॉटने टिच्चून गोलंदाजी करताना ८ षटकांत २१ धावांत ४ बळी घेतले, तर डेल स्टेनने ३९ धावांत २ बळी घेतले.
गेल्या आठवडय़ात वेस्ट इंडिजविरुद्ध आफ्रिकेने ५ बाद ४०८ धावा केल्या होत्या. त्या वेळी वेगवान दीडशतकी खेळी उभारणारा कर्णधार ए बी डी’व्हिलियर्स मंगळवारी २४ धावा काढून माघारी परतला.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका :
५० षटकांत ४ बाद ४११ (हशिम अमला १५९, फॅफ डय़ु प्लेसिस १०९, डेव्हिड मिलर नाबाद ४६, रिली रोसोऊ नाबाद ६१; अँडी मॅकब्रायन २/६३) विजयी वि. आर्यलड : ४५ षटकांत सर्व बाद २१० (अँडी बॅलबिर्नी ५८, केव्हिन ओ’ब्रायन ४८; कायले अ‍ॅबॉट ४/२१, मॉर्ने मॉर्केल ३/३४)
सामनावीर : हशिम अमला.

२०   एकदिवसीय प्रकारातील हशिम अमलाच्या शतकांची संख्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता ए बी डी’व्हिलियर्ससह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी. या यादीत २१ शतकांसह हर्षेल गिब्स अव्वल स्थानी. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २० शतके साकारणारा केवळ १२वा फलंदाज.

१११    विसावे शतक झळकावणाऱ्या हशिम अमलाचा सामना क्रमांक. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान २० शतके झळकावण्याचा विक्रम आता हशिम अमलाच्या नावावर. त्याने भारताच्या विराट कोहलीचा १४१ सामन्यांत २०वे शतक झळकावण्याचा विक्रम मोडला.

२४७  आर्यलडविरुद्ध हशिम अमला आणि फॅफ डू प्लेसिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली भागीदारी. एकदिवसीय प्रकारात दक्षिण आफ्रिकेसाठी दुसऱ्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी. एकदिवसीय प्रकारात दक्षिण आफ्रिकेसाठी कोणत्याही विकेटसाठीची दुसरी सर्वोच्च भागीदारी.ह्ण

  एकदिवसीय प्रकारात २४७ धावांच्या भागीदारीत अमलाच्या सहभागाची संख्या. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही विकेटसाठी २४७ धावांच्या भागीदारीचा विक्रम तीनच वेळा झाला आहे. या तिन्ही भागीदाऱ्यांमध्ये हशिम अमलाचा सहभाग.

विश्वचषकात २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी दक्षिण आफ्रिकेने मिळवलेल्या विजयांची संख्या. विश्वचषकात या अंतराने सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी. सलग दोन सामन्यांत २०० धावांच्या अंतराने विजय मिळवणारा दक्षिण आफ्रिका पहिलाच संघ.

आम्ही आमच्या कामगिरीवर समाधानी आहोत. जिंकणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ते आम्ही साध्य करत आहोत. प्रमुख फलंदाजांनी शतक झळकावणे मोठय़ा धावसंख्येच्या दृष्टीने उपयोगी ठरते. हशिम अमलाच्या खेळातील सातत्य अद्भुत आहे.
– ए बी डी’व्हिलियर्स, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार